सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार

Sachin And Seema News Update: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सीमा हैदरचा प्रियकर सचिन हा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 25, 2023, 06:34 PM IST
सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार title=
Seema Haider, husband Sachin missing from Greater noida

Sachin And Seema News: पाकिस्तानची बोर्डर पार करुन भारतात आलेल्या सीमा हैदरने (Seema Haider) देशात खळबळ उडाली आहे. नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीना (Sachin Seema) यांच्यासोबत लग्न करण्यासाठी सीमा चार मुलांसह भारतात आली असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र, सीमाच्या दाव्यावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसकडून तिची चौकशीही करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. सीमाचा प्रियकर सचिन हा घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सचिन हा कुठे गेला याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाहीये. (Seema Haider News)

सचिन मीना घरातून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सचिनला एटीएसने ताब्यात घेतलं असल्याचंही बोललं जात आहे. आधार कार्डमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त  दिलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. 

रविवारीदेखील नोएडा पोलीस सचिनला बुलंदशहर येथे घेऊन गेले होते. आधार कार्डमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांखाली जनसेवा केंद्राच्या दोन संचालक भावांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ATSला सीमाच्या आधारकार्डमध्ये फेरफार केल्याची पक्की माहिती मिळाली होती. ही फेरफार बुलंदशहरच्या जनसेवा केंद्र चालवणाऱ्या दोन भावांकडून करण्यात आली होती. जनसेवा केंद्रातून सीमाच्या खात्यात काही पैसेही ट्रान्सफर करण्यात आले होते. 

पोलिसांनी या दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले आहे. आता पोलिस सचिनची चौकशी करत असून त्याच्या व सीमाच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. जर गुन्हा दाखल झाल्यास सचिन-सीमाला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. एटीएसने रविवारी पाच तासांपेक्षा जास्त वेळ सचिनची चौकशी केली होती. आताही सचिनला चौकशीसाठी घेऊन गेले असतील, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. लवकरच डिटेंशन सेंटरमध्ये तिला पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सीमाची ओळखपत्रे, तिचा व तिच्या मुलांचा पासपोर्ट पाकिस्तानी एंबेसीमध्ये पाठवण्यात आला आहे. एंबेसी कागदपत्रे पाकिस्तान सरकारला सीमाचा अहवाल पाठवण्यात येईल. जर सीमाही पाकची नागरिक असल्याचे तिथल्या सरकारने मान्य केल्यास तिला पाक दूतावासाकडे सोपवले जाईल. अन्यथा पुराव्यांच्या आधारे तिला डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल.