मुंबई : तुम्ही जर तुमच्या DTH सेवा देणाऱ्या कंपनीला वैतागला असाल किंवा तुम्हाला त्या कंपनीची सेवा आवडत नसेल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता तुमच्याकडे पर्याय तयार असून, मोबाईल नंबर प्रमाणे तुम्ही तुमचे DTH कनेक्शनही पोर्ट करू शकता. महत्त्वाचे असे की, यासाठी तुम्हाला तुमचे सेट-टॉप बॉक्स बदलण्याची मुळीच गरज पडणार नाही. ही सुविधा अगदी सोपी असून, मोबाईल पोर्टेबिलीटी इतकीच सोपी असणार आहे.
अद्याप ही सुविधा सुरू झाली नसली तरी येत्या सहा ते आठ महिन्यांमध्य़े ही सुवीधा सुरू केली जाणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) चेअरमन आर एस शर्मा यांच्या हवाल्याने डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार सेंटर फॉर डेव्हलपमेंट द टेलिमॅटिक्स (सीडीओटी) सोबत सहा महिन्यांपूर्वी बंगळुरूमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत DTH पोर्टेबिलीटीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सीडीओटी एक अशी एजंन्सी आहे जिला सेट-टॉप बॉक्स इंटरऑपरेबिलिटीसाठी एक प्रोटोटाईप आणि टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर विकसीत करण्यासाठी सांगण्यात आले होते.
DTH पोर्टेबिलीटीची सुविधा देण्यात यासाठी ट्राय गेली अनेक दिवस काम करत होती. शर्मा यांनी सांगितले की, नवी सुविधा वापरत असताना या बदलासोबत जोडला गेलेला पैसा हा सुद्धा महत्तवाचा मुद्दा आहे. दरम्यान, सध्यस्थितीला सर्विस प्रोव्हायडर एका सेट-टॉप बॉक्स साठी ग्राहकांकडून 1700 ते 2000 रूपये आकारातात. हा पैसा नॉन रिफंडेबल असतो. त्यामुळे ग्राहक आपली आपली DTH सेवा बदलण्याबाबत विचारच करत नाही.मात्र, यापूढे ग्राहकांसमोर हा विषय राहणार नसून, सेवा पोर्ट करण्यासाठी आता केवळ एक कार्ड बदलावे लागणार आहे. याचाच अर्थ असा की, सेट टॉप बॉक्स तोच राहील त्यातील कार्ड मात्र वेगळे असेन. याशिवाय ही सेवा घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्कही आकारले जाणार नाही.
शर्मा यांनी सांगितले की, ही सेवा उपलब्ध करून देणे हेसुद्धा मेक इन इंडियाचाच एक भाग आहे. येत्या 5 ते 6 महिन्यांमध्ये ही सुविधा ग्राहकांना आम्ही उपलब्ध करून देऊ असा विश्वासही शर्मा यांनी माहिती देतान व्यक्त केला.