नवी दिल्ली - ऑनलाईन विक्री क्षेत्रातील दिग्गज ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर केंद्र सरकारने बुधवारी विशेष निर्बंध जारी केले. बाजारात प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, या तत्त्वानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी या दोन्ही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. ज्या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांचे समभाग आहेत. त्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री या दोन्ही कंपन्या आपल्या वेबसाईटवरून करू शकणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. त्याचबरोबर ऑनलाईन विक्री क्षेत्रातील कोणतीही कंपनी कोणत्याही उत्पादनांच्या ऑनलाईन विशेष विक्रीसाठी संबंधित कंपनीशी करार करू शकणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही बाजारात व्यवसायाची समान संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने सरकारने हे निर्बंध घातले आहेत.
वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ई-कॉमर्स क्षेत्रातील ज्या कंपन्यांचे इतर कंपन्यांमध्ये समभाग आहेत. किंवा त्या त्यांच्या समूहातील कंपन्या आहेत. किंवा त्यांच्या उत्पादनावर ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांचे नियंत्रण आहे, अशा कंपन्यांची उत्पादने ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना म्हणजे अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांना विकता येणार नाहीत. ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी केल्यावर ग्राहकांना दिला जाणारा कॅशबॅक हा सुद्धा समतोल आणि ग्राहकांमध्ये भेदभाव करणारा असू नये, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एक फेब्रुवारीपासून हा बदल अंमलात येणार आहे. किरकोळ व्यावसायिकांनी ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांविरूद्ध केलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय सरकारने घेतला.