मुंबई : रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आज सलग 6 व्या दिवशी बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होता. रशियाने आज थेट लष्करी कारवाई सुरू केल्याने जागतिक बाजारांतील गुंतवणूकदार धस्तावले. त्याचा परिणाम म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला. भारतीय शेअर बाजारातील निफ्टी आणि सेंन्सेक्समध्येही प्रचंड घसरण दिसून आली.
मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेंक्स 2700 अंकांनी घसरून 54529 अंकांवर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी 800 अंकांनी घसरून 16247 अंकांवर बंद झाला.
रशिया - युक्रेन वादाचा जबरदस्त फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. तब्बल 15 लाख कोटींचे नुकसान झाल्याने गुंतवणूकदार रडकुंडीला आले आहे. परंतू घसरणीच्या पार्श्वभूमीवर मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी म्हणतात की, युक्रेन रशियाची युद्धजन्य परिस्थिती कायम राहणार नाही. दीर्घ कालीने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कायम ठेवावी.
बाजाराच्या घसरणीनंतर शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सध्याच्या घसरणीला पाहून पॅनिक होण्याची गरज नाही. परंतू युद्धांचा महागाईवरही परिणाम होतो. त्यासाठीही तयार राहण्याचा सल्ला इराणी यांनी दिला आहे.