उन्नाव : 'मला वाचवा, मला जगायचंय', मृत्यूपूर्वीही तिनं जगण्याची आशा सोडली नव्हती

'आम्ही तिच्या शरीराचा दफनविधी करणार आहोत... जळण्यासाठी आता काहीही उरलेलं नाही' अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या भावानं व्यक्त केलीय

Updated: Dec 7, 2019, 03:04 PM IST
उन्नाव : 'मला वाचवा, मला जगायचंय', मृत्यूपूर्वीही तिनं जगण्याची आशा सोडली नव्हती

नवी दिल्ली : 'मला जगायचंय दादा, मला वाचवा आणि गुन्हेगारांना सोडू नका' अशी आर्त साद उन्नावमधील पीडितेनं आपल्या भावाला घातली होती. ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यानंतरही तिनं जगण्याची उमेद सोडली नव्हती. गुरुवारी सकाळी पीडित तरुणीला भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी इन्फेक्शनचा धोका असल्याचंही सांगितलं होतं. योग्य उपचारासाठी गुरुवारी रात्री पीडितेला एअर एम्ब्युलन्सच्या सहाय्याने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, दुर्दैवानं शुक्रवारी रात्री ११.४० वाजल्याच्या दरम्यान, व्हेन्टिलेटरवर ठेवलेल्या पीडित तरुणीचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. 

यानंतर, 'आम्ही तिच्या शरीराचा दफनविधी करणार आहोत... जळण्यासाठी आता काहीही उरलेलं नाही' अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या भावानं व्यक्त केलीय.

(अधिक वाचा : उन्नावप्रकरणी हैदराबादसारखीच शिक्षा द्या, पीडितेच्या वडिलांची मागणी)

सफदरजंग रुग्णालयाच्या मेडिकल सुप्रिटेन्डंट डॉक्टर सुनील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मृत्यूअगोदर आपल्या भावाकडे वारंवार आरोपींना शिक्षा मिळवून देण्याचा आग्रह करत होती. ९० टक्क्यांहून अधिक भाजलेली असतानाही तीनं बोलणं सोडलं नव्हतं.

बलात्कारपीडित महिलेला गुरुवारी ५ डिसेंबर पहाटे पाच जणांनी जाळण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या गावातील हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश बाजपेयी, शिवम द्विवेदी आणि शुभम द्विवेदी या पाच जणांची आपल्याला पेटवून दिल्याचं पीडितेनं मृत्युपूर्वी जबाब नोंदविताना म्हटलंय. सोबतच आरोपींनी आपल्याल मारहाण करत चाकूनं जखमी केल्याचंही तिनं सांगितलं. यातील हरिशंकर आणि शुभम हे पिता-पुत्र आहेत. पाचही जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलंय. पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्सही मिळवलेत. आरोपींवर आयपीसी कलम ३०७, ३२६, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

उन्नाव सामूहिक बलात्कार - हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

- मार्च २०१९ मध्ये पीडित तरुणीनं गावातील शिवम द्विवेदी आणि शुभम द्विवेदी दोघांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली

- यातील मुख्य आरोपी शिवम द्विवेदी याला पोलिसांनी अटक केली. गेल्या शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी शिवमला जामीन मंजूर करण्यात आला होता. तर दुसरा आरोपी शुभम पहिल्यापासूनच फरार होता

- गुरुवारी ५ डिसेंबर रोजी पीडित तरुणी सकाळी ४.१५ वाजल्याच्या सुमारास याच खटल्याच्या सुनावणीसाठी रायबरेली जाण्यासाठी बसवारा रेल्वे स्टेशनकडे निघाली असताना आरोपींनी तिला गाठलं... आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला

(अधिक वाचा : बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक)

- रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पीडितेनं शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी,  हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी आणि उमेश बाजपेई यांनी आपल्याला पेटवून दिल्याचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर गंभीर भाजलेल्या अवस्थेत तरुणीनं दिला

- शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजल्याच्या दरम्यान आरोपींना सीजेएम कोर्टाच्या आदेशानुसार बिहार पोलिसांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत टाकलं. अत्यंत सुरक्षेत या आरोपींना पोलिसांनी उन्नाव जिल्हा कारागृहात नेलं

(अधिक वाचा : 'उन्नाव' उत्तर प्रदेशातील 'रेप कॅपिटल')

दरम्यान, घरी आपल्या नातेवाईकांना धमक्या मिळत असल्याची तक्रारही दिल्लीत असलेल्या पीडितेच्या भावानं दाखल केलीय. कोतवाली गंगाघाटच्या सीताराम कॉलनीमध्ये राहणाऱ्या आपल्या काका-काकुंना फोनवरून धमक्या मिळत असल्याचं त्यानं म्हटलंय. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया दिलीय. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं म्हटलंय.