Person Killed For Asking Address: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सीहोर येथे एक अजब आणि तितकाच धक्कायक प्रकार घडला आहे. सीहोर शहरामधील कर्बला पुलाजवळ शुक्रवारी एका व्यक्तीने त्याला पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीची हत्या केली. पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून या व्यक्तीने त्याला जखमी केलं आणि त्यानंतर या व्यक्तीच्या शरीराचे 7 तुकडे केले. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी हा मानसिक रुग्ण आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र समोर पडलेला रक्तामांसाचा सडा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हा मनोरुग्ण या व्यक्तीवर हल्ला करत होता तेव्हा त्याला परावृत्त करण्यासाठी अनेकजण त्याला दगड मारत होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ही व्यक्ती कुऱ्हाडीने समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर वार करत राहिली. मृतदेहाचे 7 तुकडे केल्यानंतर ही व्यक्ती कर्बला पुलाजवळ जाऊन बसली. पोलिसांनी या व्यक्तीला याच ठिकाणाहून अटक केली.
हल्लेखोराचं नाव सुरेंद्र कुशवाह असं आहे. तो 40 वर्षांचा आहे. सुरेंद्र हा सिराडी येथील रहिवाशी आहे. मरण पावलेल्या व्यक्तीची ओळख सुरज कुशवाह अशी करण्यात आली असून तो 28 वर्षांचा होता. सिवान नदीजवळ असलेल्या वीट भट्टीमध्ये सुरज कामानिमित्त गेला होता. सुरजच्या घराचं काम सुरु असल्याने तो आपल्या दुचाकीवरुन या वीट भट्टीवर गेला होता. तिथे पोहचल्यानंतर तो कोणाला तरी शोधत होता. त्यावेळी काही अंतरावरुन येणाऱ्या सुरेंद्रला पाहून सुरजने त्याला पत्ता विचारला. वीट भट्टीचा मालक कुठे राहतो असं सुरजने सुरेंद्रला विचारलं. तो प्रश्न ऐकताच सुरेंद्रने सुरजवर हातातील कुऱ्हाडीने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरज जोरात किंचाळून जागीच कोसळला.
त्यानंतर सुरेंद्रने सुरजच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे सुरजची कवटी फुटली आणि रक्त वाहू लागले. सुरेंद्रने सुरजचे दोन्ही हातही कुऱ्हाडीने तोडले. सुरेंद्रने सुजच्या पोटावर वारंवार कुऱ्हाडीने वार करुन धडाचा भाग पायापासून वेगळा केला. लोकांनी सुरजच्या किंकाळ्या ऐकून घटनास्थळी धाव घेतली. मात्र सुरेंद्रच्या हाती कुऱ्हाड असल्याने कोणीही त्याच्या जवळ गेलं नाही. सर्वजण दगड मारुन त्याला हलकवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश आलं नाही. दमल्यानंतर सुरेंद्रच तिथून निघून गेला. त्याच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती.
प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. थोड्याच अंतरावर बसलेल्या सुरेंद्रला पोलिसांनी अटक केली. सुरजचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.