नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. या 7 दशकांमध्ये देशात अनेक बदल झाले. लोकांच्या लाईफ स्टाईलपासून ते व्यवसाय, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नोलॉजी या सर्वच क्षेत्रात क्रांती झाली असून भारत आज जगातील टॉपच्या देशांमध्ये आहे. पण या 74 वर्षांमध्ये काही बदलेलं नसेल ते म्हणजे लोकांचं सोन्यासाठी असलेलं प्रेम, भारतीयांची सोन्याची आवड. पण गेल्या इतक्या वर्षात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1947 पासून ते आतापर्यंत सोनं 600 पटींनी महाग झालं आहे.
15 ऑगस्ट 1947 दरम्यान सोन्याचा भाव इतका होता, ज्या भावात आज जवळपास दिड लिटर दूध मिळतं. आज जे सोनं 52 हजारांच्या पार आहे, ते 1947 मध्ये केवळ 88.62 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकं होतं. त्या वेळेला मात्र, हा भावही जास्तच होता. कारण 1947 मध्ये दरडोई वार्षिक उत्पन्न 249.60 रुपये इतकं होतं. जे आजच्या तुलनेत अतिशय कमी आहे. तर 2015 मध्ये दरडोई वार्षिक उत्पन्न 88,533 रुपये इतकं झालं. म्हणजेच दरडोई उत्पन्नात साडेतीनशे पटीने वाढ झाली आहे.
सोन्याचे भाव अनेक गोष्टींवर आधारित असतात. आजकाल सोन्याच्या किंमतींवर मागणी-पुरवठा, डॉलरचा भाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, जागतिक राजकीय वातावरणाचा परिणाम होतो. जगात काहीही घडामोडी घडल्या तरी सामान्यपणे सर्वप्रथम त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाल्याचं पाहायला मिळतं. गुंतवणूकदारांमध्ये आजही सोन्याची गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे जगभरातील बाजाराचा परिणाम सोन्यावर होऊन त्याच्या किंमतीत वाढ झाल्याची दिसते.
15 ऑगस्ट 1947 मध्ये एका डॉलरचा भाव एक रुपयाच्या बरोबर होता. पण आज एका डॉलरचा भाव 75 रुपयांच्या जवळपास आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत डॉलर 75 रुपयांनी मजबूत आणि रुपया कमजोर झाला आहे. देशात सोनं मर्यादित आहे, त्यामुळे मागणीची पूर्तता करण्यासाठी जर सोनं परदेशातून मागवलं तर त्याची किंमत डॉलरमध्ये मोजावी लागते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होत असल्याचं बोललं जातं.