नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला. गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची. भाजपच्या गोटात यावर विचार विनिमय सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. यात मजी अभिनेत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नाव आघाडीवर असून, इतरही चेहरे चर्चेत आले आहेत.
182 जागांपैकी 99 भाजप, 80 काँग्रेस आणि इतर 3 अशी गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल आहे. या वेळी गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच पक्षाच्या प्रमुख वर्तुळात मुख्यमंत्रीपदावर कोणता चेहरा बसवायाचा यावर चर्चा सुरू आहे. भाजपने सुरूवातील विजय रूपाणी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवड केली होती. मात्र, प्राप्त माहितीनुसार, रूपाणी यांच्याऐवजी भाजप दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नावावर गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय नेतृत्व शिक्कामोर्तब करू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वावर भाजप नेतृत्व खूश असून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्या नेतृत्वाची पहिली पसंती आहेत. दरम्यान, इराणींच्या नावाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच, इराणी यांनीही या चर्चेबाबत कोणतेही मत व्यक्त केले नाही.
दरम्यान, स्मृीत ईराणी यांच्या नावासोबतच इतरही काही चेहरे चर्चेत आहेत. यात केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यार्ग राज्यमंत्री मनसुख एल मंदाविया यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे. मंदाविया हे सौराष्ट्रातील पाटीदार समुदयातून येतात. तर, कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल तसेच, गुजरात विधानसभेचे माजी अध्यक्ष वजूभाई वाला यांचेही नाव चर्चेत आहे. वजूभाईंनी गुजरात कॅबिनेटमध्ये अर्थ, श्रम आणि रोजगार या विभागाचा कारभार सांभाळला आहे.