दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

कॅगचा हा अहवाल सोमवारी संसदेसमोर सादर करण्यात आला

Updated: Feb 4, 2020, 04:16 PM IST
दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल title=

नवी दिल्ली : सियाचीन, (Siachen), लडाख (Ladakh), डोकलाम (Doklam) यांसारख्या उंचावरच्या  (High Altitude) ठिकाणांवर तैनात असणाऱ्या सैनिकांना गरजेनुसार योग्य कॅलरीज देणारं जेवणंही मिळत नाही. सोबतच या ठिकाणी त्यांना विशेष कपड्यांची गरज असते, ती गरजदेखील योग्य वेळी पूर्ण झाली नाही. या कपड्यांचे खरेदी उशिरा झाली. जुन्याच स्पेसिफिकेशनचे कपडे आणि हत्यारं, उपकरणं सैनिकांना दिली गेली. अशा अनेक धक्कादायक गोष्टी २०१७-१८ कॅगच्या अहवालातून समोर आल्यात. कॅगचा हा अहवाल सोमवारी संसदेसमोर सादर करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, उंचावरच्या दुर्गम भागांत तैनात सैनिकांना विशेष राशन देण्याची तरतूद आहे. 

सामान्य वस्तूंच्या जागी महागड्या वस्तू गेतल्यानं सैनिकांना मिळणाऱ्या कॅलरींची संख्या कमी झाली, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. सेनेच्या ईस्टर्न कमांडनं ओपन टेंडर सिस्टम द्वारे करार केला. परंतु, नॉर्दन कमांडकडून मात्र लिमिटेड टेंडरिंगद्वारे खरेदी करण्यात आली, असंही कॅग अहवालात नमूद करण्यात आलंय.

उंचावरच्या दुर्गम भागात सैनिकांसाठी आवश्यक असणारे कपडे खरेदी करण्यासाठी मंत्रालयानं २००७ मध्ये एक एम्पावर्ड कमिटी बनवली होती. कपड्यांची खरेदी योग्य पद्धतीनं आणि लवकरात लवकर व्हावी, हा या समितीचा उद्देश होता. परंतु, त्यानंतरही कपडे मिळण्यासाठी चार वर्ष वाट पाहावी लागली. सुरक्षा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून घेण्यात येणारं सामान मिळण्यासाठीही उशीर झाला.

या सर्व प्रकारामुळे सैनिकांना आवश्यक कपडे आणि उपकरणांचीही उणिव भासत होती. फेस मास्क, जॅकेट आणि स्लिपिंग बॅगही जुन्या स्पेसिफिकेशन्सचे खरेदी करण्यात आले, त्यामुळे सैनिकांपर्यंत योग्य आणि चांगल्या पद्धतीच्या वस्तू पोहचू शकल्या नाहीत. त्याचा परिणाम सैनिकांच्या स्वास्थ्यावरही पडला.