गेल्या वर्षभरापासून गरजूंच्या हाकेला तात्काळ ओ देणारा सोनू सूद आता लवकरच आणखी मदतीचा हात पुढे करणार आहे. सोनू सूद लवकरच ऑनलाईन ब्लड बँक सुरू करणार आहे. ज्यांना रक्ताची गरज आहे, अशांना दात्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म असणार आहे.
सोनू सूदने ट्विट करत यासंदर्भातला एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, देशभरात दरवर्षी 12 हजार रुग्ण रक्त न मिळाल्यानं मृत्यूमुखी पडतात. एखाद्याचा जीव वाचवायचा असेल, तर तुम्हाला डॉक्टरच असायला हवं असं नाही, रक्तदानाच्या माध्यमातूनही तुम्हा एखाद्याचे प्राण बचावू शकता, असा संदेश सोनू सूदने दिला आहे.
Let's save lives.
Your own Blood Bank coming soon.@IlaajIndia @SoodFoundation pic.twitter.com/ZaZIafx46Y— sonu sood (@SonuSood) March 3, 2021
सोनू फॉर यू असं या अॅपचं नाव असण्याची शक्यता आहे. बऱ्याचदा एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असल्याचे मेसेज आपण सोशल मीडियावर पाहत असतो, अनेकदा त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र हे सगळं करण्यासाठी गरजूला धडपड करावी लागते. त्यापेक्षा एखादं अॅप असेल, जे गरजू आणि दात्याला जोडत असेल, तर एखाद्याचा जीव बचावणं लवकर शक्य होईल, असं सोनूचं मानणं आहे.
ब्लड बँकेत जा, रक्ताचा गट शोधा, नाही मिळाला तर पुन्हा दुसरीकडे जा, इतका खटाटोप करण्यापेक्षा एका अॅपच्या माध्यमातूनच दाता शोधणं सहज शक्य होईल, असं सोनू इंडो एशियन न्यूज सर्व्हिसेसला म्हणाला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन काळापासूनच सोनूच्या सामाजिक बांधिलकेचं दर्शन भारताला घडलंय. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवणं, परदेशातून लोकांना भारतात आणणं, ऑनलाईन शिक्षण मिळत नसलेल्यांना मदत करणं, विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटणं, उपचारात रुग्णांना आर्थिक मदत करणं यांसारखी अनेक सामाजिक कार्य सोनू सूदनं करत आपल्या चाहत्यांचं खरोखर मन जिंकलंय.