Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूकीच्या निकालाचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. महायुती-मविआत काँटे की टक्कर आहे. गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर सरकार स्थापन होईपर्यंत निवडून आलेल्या आमदारांभोवती जागते रहो चा अखंड पहारा दिला जाणाराय.
घासुन येणार की ठासुन येणार याचं निश्चित उत्तर यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआ या दोन्ही बाजुंकडे नाहीय. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांची गरज लागणाय. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बदलेली सरकारं, शिंदेंचा गुवाहाटी दौरा आणि पक्षांमधली फुट यांमुळे राजकिय पक्षांना बरेच धडे शिकवलेत. त्यामुळेच यंदा सगळेच राजकीय पक्ष नो रिस्कच्या भूमिकेत आहेत. निकाल हातात पडताच विजयी उमेवारांनी तातडीनं मुंबई गाठण्याच्या सूचनाच मविआकडून पक्षांकडून देण्यात आलेत.
निवडून येणाऱ्या आमदारांसाठी मविआकडून चक्क हॉटेल, विमान, चॉपर्स सज्ज ठेवण्यात आलेत. विजयी उमेदवारांना निकाल प्रमाणपत्र हातात पडताच मुंबई गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईकडे येताना आमदारांना एकत्र ठेवण्याकरता विशेष राखीव विमानांचा वापर करण्यात येणार आहे. आमदारांकरीता चॉपर, विमानं, हॉटेल्सचं बुकींग करण्यात आलंय. विभागानुसार सर्व आमदारांना एकत्रित येण्याच्या सूचना करण्यात आलेत. पक्षांकडून आमदारांना सतत संपर्कात ठेवण्याच्याही सूचना देण्यात आलेत. मुंबईत राजकीय पक्षांच्या युनियन असलेल्या हॉटेल्समध्येच आमदारांच्या राहण्याची व्यवस्थेची तयारी करण्यात आलीय. गरज पडल्यास महाराष्ट्रा व्यतिरीक्त इतर राज्यांमध्येही आमदारांना एकत्रित ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आलीय.
आमदारांना सुरक्षित मुंबईला आणण्यासाठी व्यवस्था करण्यात काँग्रेसनं आघाडी घेतलीय. मुंबईत ग्रॅन्ड हयात, ट्रायडंट यांसारख्या हॉटेल्समधील रुम बुकींग करण्याची तयारी सुरुय. चॉपर, विमानं यांच्या मदतीनं आमदारांना मुंबईत आणलं जाईल. विशेषत: मुंबईपासून लांब असलेल्या विदर्भातून लवकरात लवकर सगळे आमदार मुंबईत कसे दाखल होतील याकडे काँग्रेसचं लक्ष आहे. खबरदारी म्हणून कर्नाटक, तेलंगणा याठिकाणीही व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे.
मविआसोबतच महायुतीकडूनही आमदारांना आणि अपक्षांनाही संपर्क करण्याच्या हालचीली वाढलेत. अपक्ष उमेदवार आणि छोटे पक्ष यांची मोट बांधुन ठेवण्यासाठी महायुती विशेष प्रयत्न करतेय. आता शनिवारी 23 नोव्हेंबरला नेमकं काय होणार हे स्पष्ट होणार आहे.