नोएडा : राष्ट्रीय पक्षी मोर किंवा मोराची अंडी यांना इजा पोहोचवल्यास त्यात शिक्षेची तरतूद आहे, असे असूनही पुन्हा एकदा एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या बिरमपूर गावात मोराची अंडी चोरून नेऊन ऑमलेट करुन खाल्याची घटना चव्हाट्यावर आली आहे. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
चार तरुणांवर राष्ट्रीय पक्षी मोराची अंडी चोरी केल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अंड्याचे वरील आवरण फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अंडी चोरी झाली. तेव्हा गावकऱ्यांनी तपास केला असता एका मुलाला माहिती मिळाली की, त्याने चार तरुणांना अंडी घेऊन जाताना पाहिले आहे. गावकरी आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांनी त्याचे आमलेट बनवून खाल्ले. आरोपींनी ग्रामस्थांना तेथून पळवून लावले. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.
मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत मोराची शिकार, अंडी नष्ट करणे आणि खाणे बेकायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, दोषी ठरल्यास आरोपींनी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.