Government Scheme: रोज 300 रुपये गुंतवा 50 लाख मिळवा! 'या' सरकारी योजनेतून मिळेल लाभ

Government Scheme: या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये केवळ 2 खाती सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियोजित कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याचा हेतू असेल तर तुम्ही नक्कीच केंद्र सरकारच्या या योजनेचा विचार करु शकता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 18, 2023, 10:43 AM IST
Government Scheme: रोज 300 रुपये गुंतवा 50 लाख मिळवा! 'या' सरकारी योजनेतून मिळेल लाभ title=
सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी

Sukanya Samriddhi Account Scheme: केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने आर्थिक तरतुदी करणं पालकांना शक्य होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी निधी जमण्याचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे. या योजनेअंतर्गत आई-वडिलांना त्यांच्या 1 ते 10 वर्षांच्या वयोगटातील 2 मुलींच्या नावे गुंतवणूक करता येईल. एका कुटुंबामध्ये जास्ती जास्त 2 खाती सुरु करण्याची परवानगी आहे. तर जुळ्या मुलांसंदर्भात 3 मुलांच्या नावे गुंतवणुकीला परवानगी आहे.

15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची मूभा

सध्याच्या घडीला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 8 टक्के व्याज मिळत आहे. एका खात्यामध्ये वर्षभरात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवलेल्या खात्यावरील रक्कमेवर दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळेल. हे खातं सुरु केल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी मॅच्युअर होतं. खातं सुरु केल्यानंतर 15 वर्ष यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

...तर मिळतील 67.3 लाख रुपये

सुकन्या समृद्धी योजनेच्या कॅलक्युलेटरच्या मदतीने हिशेब लावल्यास दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा करुन पालक एकूण 67.3 लाख रुपयांपर्यंतचा निधी या माध्यमातून जमवू शकतात. यावर 8 टक्के व्याज आणि संपूर्ण मॅच्युअरिटी म्हणजेच 21 वर्षांच्या कालावधीनंतर पैसे काढले तर 67.3 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही 2023 मध्ये या योजनेअंतर्गत 8 टक्क्यांनी 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर मॅच्युअरिटीला 67.3 लाख रुपये मिळतील.

व्याजदरावर अवलंबून

व्याजाचे दर वाढवण्यात आले तर अधिक निधी मिळू शकतो. पण हेच दर कमी केले तर अपेक्षित निधीपेक्षा कमी पैसे मिळू शकतात. 

50 लाख रुपये हवेत तर किती गुंतवणूक करावी लागेल?

सुकन्या समृद्धी योजनेच्या कॅलक्युलेटरनुसार दरवर्षी 1 लाख 11 हजार 370 रुपये जमा केले तर मॅच्युअरिटीला 50 लाख रुपये मिळतील. म्हणजेच रोज किमान 300 रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. मात्र हे गणित 8 टक्के व्याजदरानुसार आहे. त्यात बदल झाला तर निधी कमी जास्त होऊ शकतो.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती आता उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)