Raigad News : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबईच्या दिशेनं निघालेली (Maruti Suzuki Celerio) मारुती सुझुकी सेलेरिओ या कारच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भयंकर अपघात घडला.
चालकानं कारवरील नियंत्रण गमावताच महामार्गावरून थेट पुलाचा कठडा तोडून ही कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की यामध्ये कारचा पूर्णतः चक्काचूर झाला. या कारमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करत होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त आहे.
मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर राहणार अँटॉप हिल मुंबई अशी मृतांची ओळख समोर आली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अपघाताची दृश्य पाहून अतिप्रचंड वेगानं इथं ग्रामस्थ आणि क्रेनच्या साहाय्यानं कार वर काढण्यात आली. तर, त्यातील जखमी प्रवाशाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव इथं दाखल करण्यात आलं.
कार जेव्हा पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली तेव्हा नदीपात्रात फारसं पाणी नसल्यानं त्यामध्ये असणाऱ्या मोठाल्या खडकांवर ती आदळली. ज्यामुळं संपूर्ण कार चेपली गेली आणि कारमध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यास वाव नसल्यानं या भयंकर अपघातात त्यांचा मृत्यू ओढावला.
मागील काही दिवसांमध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अनेक अपघात घडल्याची वृत्त समोर आली आहेत. रस्त्याच्या अंदाज न येणं, समोरून येणाऱ्य़ा वाहनाच्या वेगाचा अंदाज न येणं, वेग नियंत्रणात नसणं, घाटरस्त्यांच्या वळणांवर वाहनाचं नियंत्रण गमावणं या आणि अशा कैक कारणांमुळं हे अपघात घडल्याचं पाहायला मिळालं आहे.