अहमदाबाद: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरत येथील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांची प्रचंड चर्चा सुरु आहे. ढोलकिया यांनी आपल्या ६०० कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून कार दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ढोलकिया यांची दखल घेतली होती. त्यामुळेच मोजक्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते कारच्या चाव्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर ढोलकिया यांची चांगलीच चलती होती.
मात्र, नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार ढोलकियांच्या दानशूरपणातील एक त्रुटी दिसून आली आहे. ढोलकिया यांनी ६०० कर्मचाऱ्यांना कार दिल्या, ही गोष्ट खरी असली तरी ती पूर्णपणे सत्य नाही. ढोलकिया यांच्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगारातून महिन्याकाठी बोनसची रक्कम कापण्यात येते. गाड्या विकत घेताना हीच रक्कम डाऊन पेमेंट म्हणून वापरण्यात आली. त्यामुळे ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना कार दिल्या हे खरे असले तरी त्यासाठी कर्मचाऱ्यांना किंमत मोजावी लागली, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ६०० कर्मचाऱ्यांना कार मिळाल्या त्यांच्याशी ढोलकिया यांनी करार केला आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना पुढील पाच वर्षे दुसऱ्या कंपनीत नोकरी करता येणार नाही. तसेच त्यांना कारच्या मासिक हप्त्याची अर्धी रक्कमही भरावी लागणार आहे.
याशिवाय, ढोलकिया यांनी एकाचवेळी ६०० कार विकत घेतल्याने त्यांना प्रत्येक कारमागे तब्बल ८० हजारांची सूट मिळाली आहे. या सर्व गाड्यांची नोंदणी कंपनीच्या नावावर करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांवरील जीएसटीची रक्कमही ढोलकिया यांच्या कंपनीने भरली आहे. त्यामुळे ढोलकिया यांना टॅक्स क्रेडिटचा फायदाही मिळणार आहे.
सोशल मीडियावर मात्र अनेकजण ढोलकिया यांच्या दानशूरपणाचे गोडवे गाताना दिसत आहेत. ढोलकिया यांनी या सगळ्याचा प्रसिद्धीसाठी चांगला वापरही करुन घेतला. त्यामुळे अनेकजण त्यांच्या या प्रचाराला भुलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ढोलकिया यांच्या प्रसिद्धीला हातभार लावला.