सुशांतसिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर, सीबीआय चौकशीला विरोध

सुशांतसिंग मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारचं बंद लिफाफ्यात उत्तर

Updated: Aug 8, 2020, 03:13 PM IST
सुशांतसिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर, सीबीआय चौकशीला विरोध title=

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने सील बंद लिफाफ्यात चौकशी कुठपर्यंत आली याबाबतची माहिती देण्यात आली. सुशांतसिंग प्रकरणी बिहार सरकारने नियमांविरुद्ध जाऊन काम केलं, असा आरोप महाराष्ट्र सरकारने केला आहे. 

महाराष्ट्र सरकारशिवाय सुशांतचे वडिल केके सिंग यांनीही सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. रिया चक्रवर्ती साक्षीदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. रिया चक्रवर्तीने दाखल केलेली याचिका प्रभावहीन आहे, कारण या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करत आहे, असंही सुशांतचे वडिल त्यांच्या उत्तरात म्हणाले आहेत. रियाने तिच्या वक्तव्यात आणि व्हिडिओमध्ये सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, मग आता सीबीआय चौकशीला विरोध का होत आहे? असा सवालही सुशांतच्या वडिलांनी विचारला आहे. 

दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून सुप्रीम कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी पुढच्या तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे.