नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची हलकी लढाऊ विमान तेजसचा वायुदलाच्या ताफ्यात समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तेजसचे फायनल ऑपरेशनल सर्टिफिकेट हिंदुस्थान एअरॉनॉटीक्स लिमिटेडने वायुदलाला सुपूर्द केले. याआधी हॉलने १३ विमाने वायुदलाला सुपूर्द केली आहेत. पण एफओसी देणे बाकी होते. ते प्रमाणपत्रही आता दिल्यामुळे तेजस विमान पूर्ण क्षमतेने भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
३ मार्चपर्यंत पहिल्या कराराप्रमाणे आणखी ३ विमाने वायुदलाला सुपूर्द केली जातील. म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत १६ तेजस विमाने वायुदलाच्या ताफ्यात समील झालेली असतील. त्याशिवाय नंतरच्या करारानुसार मार्क १ ए या प्रकाराची तेजस ८३ विमानंही वायुदलाला हॉलतर्फे पुरवली जाणार आहेत. त्यानंतर मार्क २ ही अत्याधुनिक प्रकाराची तेजस विमानांच्या ६ स्क्वॉड्रन वायुदलाला पुरवण्यात येतील.बंगळुरू इथे सुरू असलेल्या एअरो इंडिया या शोमध्ये हॉलचे प्रमुख आर माधवन यांनी ही माहिती दिली.