11 Crore Electricity Bill: 11,41,63,672 रुपये! 'या' ग्रामपंचायतीचं बील पाहून गावकऱ्यांना बसला झटका

Electricity Bill of Rs 11 Crore: ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या मोठ्या रक्कमेचं बील पाहून सरपंचांनी थेट वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीचं कार्यालय गाठलं आणि यासंदर्भातील जाब विचारला.

Updated: Feb 16, 2023, 06:00 PM IST
11 Crore Electricity Bill: 11,41,63,672 रुपये! 'या' ग्रामपंचायतीचं बील पाहून गावकऱ्यांना बसला झटका title=
11 Crore Electricity Bill

Rs 11 Crore Electricity Bill: एखाद्या ग्रामपंचायतीला महिन्याचं लाईट बील (Electricity Bill) किती येईल? तुम्ही म्हणाल काही हजार किंवा अगदी डोक्यावरुन पाणी लाखभर रुपयांपर्यंत. मात्र एका ग्रामपंचायतीला तब्बल 11 कोटी 41 लाखांचं लाईट बील आल्याची घटना तेलंगणमध्ये घडली आहे. तेलंगणमधील कामारेड्डी जिल्ह्यामधील कोथामपल्ली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हे बील आलं आणि गावकऱ्यांना धक्काच बसला. जानेवारी महिन्याचं हे लाईट बील आहे.

सरपंच थेट कंपनीच्या ऑफिसमध्ये...

समोर आलेल्या माहितीनुसार तेलंगन स्टेट नॉर्दन पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडने (टीएसएनपीडीसीएल) पाठवलेल्या बीलमधील एकूण रक्कम 11 कोटी 41 लाख 63 हजार 672 रुपये इतकी आहे. एवढ्या रक्कमेचं बील पाहून ग्रामपंचायतीमध्ये एकच खळबळ उडाली. नेमकी एवढी वीज गावाने एका महिन्यात कशासाठी वापरली याचा तपास करण्यासाठी गावच्या सरपंचांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये धाव घेतली.

कंपनीने काय सांगितलं?

सरपंच ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर कंपनीच्या असिस्टंट इंजिनियरने बिलाचा हा गोंधळ तांत्रिक कारणामुळे झाला आहे, असं सांगितलं. गावकऱ्यांनी यासंदर्भातील आक्षेप घेत सरपंचांच्या माध्यमातून अधिकृत तक्रार नोंदवल्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा मीटरचं रिडींग घेण्याची तयारी दर्शवली आहे. नव्या रिडींगनुसार सुधारित बील पाठवलं जाईल, असं कंपनीने सांगितलं आहे.

घरचं लाईट बील 3,419 कोटी...

अशाचप्रकारे जुलै 2022 मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका महिलेला तब्बल 3,419 कोटींचं लाईट बील आलेलं. हे बील पाहून या महिलेचे सासरे आजारी पडले होते. मध्य प्रदेशमधील राज्य सरकारच्या मालकीच्या कंपनीने मानवी चुकीमुळे बिलाच्या रक्कमेमध्ये गोंधळ झाल्याचं मान्य केलं. त्यानंतर सुधारित बीलाची रक्कम 1300 असल्याचं कंपनीने सांगितलं. शिव विहार कॉलिनीमध्ये राहणाऱ्या गुप्ता कुटुंबियांबरोबर हा प्रकार घडला होता.

कर्मचाऱ्यावर झाली कारवाई

ग्वाल्हेरमधील या प्रकरणामध्ये या महिलेचा पती संजीव यांनी आपले वडील या बिलाची रक्कम पाहून आजारी पडले होते असं सांगितलेलं. घरगुती वापरासाठी एवढं वीज बील पाहून वडीलांना मोठा धक्का बसल्याने त्यांची प्रकृती खालावली असं संजीव यांनी सांगितलेलं. हे बिल बरोबर आहे का याची चाचपणी आधी कुटुंबियांनी मध्य प्रदेश मध्य क्षेत्र विद्यृत वितरण कंपनीच्या (एमपीएमकेव्हीव्हीसी) वेबपोर्टलवर तपासून पाहिलं होतं. तिथेही हेच हजारो कोटींचं बील दाखवण्यात आलं होतं. यानंतर कार्यालयात जाऊन तक्रार केल्यावर 'एमपीएमकेव्हीव्हीसी'चे जनरल मॅनेजर नितीन मांगलिक यांनी मानवी चुकीमुळे एवढं बील आल्याचं सांगताना संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा खुलासा केलेला.