सैन्यदल अधिकाऱ्यांना सलामी देणाऱ्या श्वानाच्या फोटोमागचं सत्य माहितीये?

हा फोटो बराच व्हायरल झाला होता

Updated: Dec 14, 2019, 05:16 PM IST
सैन्यदल अधिकाऱ्यांना सलामी देणाऱ्या श्वानाच्या फोटोमागचं सत्य माहितीये?   title=
छाया सौजन्य- एएनआय

श्रीनगर : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य गोष्टींमध्ये एका श्वानाच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. सैन्यदल अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लों यांना सलाम करणाऱ्या एका श्वानाचा फोटो बराच व्हायरल झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सैन्यदलातील चिनार या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी हे त्या श्वानाच्या सलामीला उत्तर देत स्वत:सुद्धा सलामी देताना दिसत आहेत. याचविषयीची एक रंजक माहिती सध्या समोर आली आहे. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सैन्यदलाशी संलग्न अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा क्षण १ जुलै रोजी कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला होता. तो अमरनाथ यात्रेचा पहिलाच दिवस होता. 

'ज्यावेळी कमांडर हे पवित्र गुहेत दर्शनासाठी जात होते, तेव्हा त्या गुहेपासून १५ किमीच्या अंतारवर असतानाच Menaka हा त्याची जबाबदारी पार पाडत होता. त्यावेळी सैन्यदल अधिकारी तेथे गेले. त्या क्षणीच श्वानाने त्यांला सलामी दिली', असं अधिकारी म्हणाले. सैन्यदलातील काही परंपरा आणि नियमानुसार प्रत्येक वरिष्ठ अधिकारी त्यांना देण्यात येणाऱ्या सलामीचं उत्तर देणं बंधनकारक असतं. त्यामुळेच लेफ्टनंट जनरल ढिल्लों यांनीही सलामी दिली होती. 

@nee_el या अकाऊंटवरुन ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेला हा फोटो ढिल्लों यांनी रिट्विट करत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या दोस्ताला सलाम असं लिहिलं. त्यांचं हे ट्विट अनेकांनी लाईकही केलं. 

सैन्यदलांच्या अनेक कारवायांमध्ये त्यांना श्वानांची मदत होते. दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांच्या कुठे लपवली आहेत याविषयीची माहिती मिळवण्यासाठी ते मदतीचे ठरतात. भारतीय सैन्यदलात असणाऱ्या प्राण्यांच्या तुकडीत (Remount Veterinary Corps RVC) फक्त श्वानच नव्हे, तर खेचर आणि घोड्यांचाही समावेश आहेत. ज्यांचा वापर विविध ठिकाणच्या कारवाईमध्ये केला जातो.