Rahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल

Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भाजपवर जोरदार टीका केली. 

Updated: Mar 27, 2023, 11:29 AM IST
Rahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सूरत हायकोर्टाने (Surat High Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालायाने राहुल गांधी यांचे खासदारकी काढून घेण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर रविवारी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. काँग्रेसने देशभरात 'संकल्प सत्याग्रह' करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi) यांनी घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपला (BJP) घेरलं आहे.

राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्याच्या विरोधात 'संकल्प सत्याग्रहा'दरम्यान प्रियांका गांधींनी घराणेशाहीवरुन भाजपला प्रत्युत्तर देताना प्रभू श्रीरामाचे उदाहरण दिले आहे. "भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष म्हणत राहतात. भगवान राम यांनाही वनवासात पाठवले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि मातृभूमीसाठी धर्माचे पालन केले. मग प्रभू राम घराणेशाही करणारे  होते का? पांडव घराणेशाहीवादी होते का? त्यांनी आपल्या कुटुंबांच्या संस्कारांचे पालन करण्यासाठी वनवास भोगला," असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

"संसदेत आणि संसदेबाहेर भाजपचे नेते वारंवार आमच्या कुटुंबाचा अपमान करतात. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. राहुल यांनी संसदेमध्ये अदानींविषयी प्रश्न विचारले तर काय चुकले?  देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत असतानाही बेरोजगारी आहे, स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होत नाहीत, छोट्या व्यापाऱ्यांना मदत करू शकत नाही," असेही असे प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या. 

"आमच्या कुटुंबातील सदस्य देशासाठी शहीद झाले याची आम्हाला लाज वाटली पाहिजे का? त्यांचे रक्त देशाच्या मातीत आहे. या देशातील लोकशाही आमच्या कुटुंबियांच्या रक्ताने भिजली आहे. आज ज्या हुतात्म्याच्या मुलाचा अपमान होत आहे, त्या गांधी घराण्याने देशासाठी आपले रक्त सांडले आहे," असेही प्रियंका गांधींनी म्हटले.

देशाचे पंतप्रधान भित्रे - प्रियंका गांधी

"या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. माझ्यावरही खटला चालवा, मलाही तुरुंगात टाका. पण सत्य हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. ते सत्तेच्या मागे लपले आहेत, अहंकारी आहेत. या देशाची, हिंदू धर्माची जुनी परंपरा आहे की अहंकारी राजाला जनता उत्तर देते," असा इशाराही प्रियंका गांधी दिला.

विरोधी पक्षनेते काळ्या कपड्यात

दरम्यान, सोमवारी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, द्रमुकचे टीआर बालू, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांचे नेते संसद भवनातील चेंबरमध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून निषेध नोंदवला आहे.