नवी दिल्ली: इतकी आंदोलने, कायदे अन् अनेकांना कडक शिक्षा होऊनही देशातील बलात्काराच्या घटना थांबायचे नाव नाही. पश्चिम दिल्लीतील किर्ती नगर परिसरातही अशीच घटना पुढे आली आहे. येथील १४ वर्षीय मुलीवर २५ वर्षाच्या मुलाने सलग दोन वर्षे सतत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालकांची हत्या करेन अशी धमकी देऊन आरोपी पीडितेवर बलात्कार करत होता. पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार पुढे आला आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक दिवस पीडितेची प्रकृती अचानक बिघडली. पालकांनी तिला रूग्णालयात दाखल केले असता, ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेकडे केलेल्या चौकशीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. पीडितेचे कुटुंबिय काही दिवसांपूर्वी किर्ती नगर इंडस्ट्रियल एरियात स्थलांतरीत झाले होते. त्या आधी ते मोती नगर परिसरात राहात होते. आरोपी हा पीडितेला मोतीनगरमध्ये असल्यापासूनच ओळखत होता आणि तो तीच्या शेजारीच राहात होता.
मोती नगरमध्ये पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तो तिच्या शाळेतही जात असे. दरम्यान, आरोपीने पीडितेसोबत तिच्या शाळेतही गैरवर्तन केले आहे का? याबाबत माहिती पुढे आली नाही. आरोपी हा पीडितेला धमकावून तिच्यावर घरीच बलात्कार करत होता की, तिला इतर ठिकाणी घेऊन जात असे. या प्रकरणात त्याला आणखी कोणाची साथ होती काय? यापाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
शुक्रवारी रात्री पीडितेची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी सध्या फरार आहे. पण, पोलिसांनी त्याच्याबाबत सखोल माहिती काढली असल्याचे म्हटले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे.