लखनऊ : लखनऊ येथील सीजेएनम कोर्टाच्या परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी वझीरगंज सत्र न्यायालय येथे झालेल्या एका बॉम्बस्फोटात दोन वकील जखमी झाल्याचं कळत आहे. संजीव लोधी असं एका जखमी वकिलांचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
स्फोट झाल्यानंतर लगेचच या परिसरात एकच गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच त्या ठिकाणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यान तीन देशी बॉम्ब हाती लागले. सध्याच्या घडीला यासंबंधीचं सविस्तर वृत्त प्रतिक्षेत आहे. असं असलं तरीही वकिलांमध्ये असणाऱ्या परस्पर वैमनस्यातून हा घातपात घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारीच्या मुद्द्यावरुन वकिलांच्या दोन गटांमध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे टोकाचा निर्णय म्हणून हे पाऊल उचललं गेल्याचं कळत आहे. कोर्टात उपस्थित असणाऱ्या वकिलांवर निशाणा म्हणूनच हा स्फोट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार जीतू यादव असं स्फोट घडवून आणणाऱ्या एका व्यक्तीचं नाव आहे. देशी साहित्याचा वापर करतच हा बॉम्ब बनवण्यात आल्याचं सध्या स्पष्ट होत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)