मुंबई : कर्नाटकातील बंगलुरूमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाने जवळपास 5 सेंटीमीटर उंचीच गणरायाची मूर्ती गिळली आहे. बसावाला शुक्रवारी ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या मुलाने खेळण्या दरम्यान गणरायाची मूर्ती गिळली. यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं. एवढंच नव्हे तर अगदी लाळ गिळायला देखील मुलाला त्रास होऊ लागला.
यानंतर मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एक्स-रे काढल्यावर छातीत बाप्पाची मूर्ती अडकल्याच समजलं. ते काढण्यासाठी डॉक्टरांनी लवचिक एंडोस्कोपिक पध्दतीची मदत घेतली. एका तासाच्या आत बाळाला एंडोस्कोपिकसाठी नेण्यात आले आणि त्यानंतर बाळाला बेशुद्ध करून मूर्ती सुरक्षितपणे काढून टाकण्यात आली. तीन तासांनंतर मुलाला खायला दिलं गेलं. मुलाने या काळात बरीच शौर्यही दाखवले आणि कोणताही त्रास न देता डॉक्टरांना पूर्णपणे सहकार्य केलं. यानंतर त्याला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला.
बालरोगविषयक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत केपी म्हणाले की, 'अन्ननलिका (फूड पाईप) मूर्तीमुळे जखमी झाली असेल. छातीत संसर्गासह अन्ननलिकामध्ये छिद्र होण्याची शक्यता देखील आहे. या व्यतिरिक्त मुलाला काहीही गिळण्यास खूप त्रास होत होता, ज्यामुळे नंतर पुढे बर्याच समस्या उद्भवू शकतात.
ओल्ड एअरपोर्ट रोडवर असलेल्या मनिपाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनीष राय म्हणाले की, 'मुलाला रूग्णालयात आणल्यानंतर तात्काळ त्याच्यावर उपचार करण्यात आले. सर्व आवश्यक चाचण्या केल्या नंतर मुलाला ताबडतोब ऑपरेटिंग थिएटरमध्ये नेण्यात आले आणि तेथे अॅनेस्थेसियोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या पथकाने ऑपरेशन सुरू केलं आणि मुलाचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले.