Udaipur Kanhaiya Lal Murder: राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एकाची हत्या झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केलीये. मात्र या घटनेनंतर हिंदू संघटनांकडून निदर्शने सुरू आहेत. निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पोलिसांनी खबरदारी घेत पुढील 24 तास इंटरनेट सेवा बंद केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे दोन जणांनी भरदिवसा एकाची गळा चिरून हत्या केली. मृत व्यक्तीच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपीने त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रियाझ मोहम्मद असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो भीलवाडा येथील असिंद भागातील रहिवासी आहे. गोस मोहम्मद असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. तो उदयपूरच्या खांजीपीर भागातील रहिवासी आहे.
घटनेची माहिती मिळताच धानमंडी व घंटाघर पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. कन्हैयालाल असे मृताचे नाव असून, त्याच्या आठ वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर काही लोक संतापले आणि तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप आहे. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी उदयपूर हत्याकांडाच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजता श्रद्धांजली सभा आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी मोर्चाची घोषणा केली आहे.
राहुल गांधी यांच्याकडून निषेध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, उदयपूरमध्ये झालेल्या निर्घृण हत्येने मला खूप धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर होणारी क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. या क्रूरतेमुळे दहशत पसरवणाऱ्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून द्वेषाचा पराभव केला पाहिजे. मी सर्वांना आवाहन करतो, कृपया शांतता आणि बंधुभाव राखा.
भाजपची गेहलोत सरकारवर टीका
भाजप नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विट केले की, उदयपूरमधील या घृणास्पद घटनेला गेहलोत सरकार जबाबदार आहे, कारण या सरकारने करौली दंगलीच्या मुख्य दंगलखोराला मोकळे सोडले. टोंकमध्ये मौलानाने हिंदूंचे गळे काढण्याची धमकी दिली, कारवाई झाली नाही. हा मारेकरी व्हिडिओ बनवून हत्याकांडाच्या धमक्याही देत राहिला, पण सरकार गप्प बसले.