नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण... आज होणार निर्णय

नीरवची बाजू मांडताना बॅरीस्टर क्लेअर मॉण्टगोमेरी यांनी अनेक चमत्कारिक दावे केलेत

Updated: Jun 12, 2019, 09:20 AM IST
नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण... आज होणार निर्णय title=

लंडन : ब्रिटनच्या हायकोर्टानं पळपुटा भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केलीय. नीरव मोदीच्या जामीन अर्जावर लंडनच्या उच्च न्यायालयात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयानं नीरवचा जामीन तीन वेळा फेटाळल्यानंतर त्यानं 'रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिस'मध्ये धाव घेतलीय. पंजाब नॅशनल बँकेची तब्बल दोन अरब डॉलरची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात भारताकडे सोपवण्यात येऊ नये, यासाठी नीरव मोदी हरएक प्रयत्न करताना दिसतोय. 

नीरवची बाजू मांडताना बॅरीस्टर क्लेअर मॉण्टगोमेरी यांनी अनेक चमत्कारिक दावे केलेत. नीरव आणि त्याच्या भावाचे ई-मेल न्यायालयासमोर ठेवून यावरून तो पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नसल्याचा अजब तर्क त्यांनी मांडलाय. नीरवची मुलं ब्रिटनला स्थलांतरीत होत असून ते इथल्या विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे तो देश सोडून पळणं शक्य नाही, असाही माँटगोमेरी यांचा युक्तिवाद आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्यानं पाळत ठेवायला किंवा ट्रॅक करता येण्याजोगा मोबाईल वापरण्यास नीरव तयार असल्याचंही त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. मात्र, हा मोठा भ्रष्टाचार असून प्रत्यार्पण खटल्याच्या या टप्प्यावर नीरवला जामीन दिला जाऊ नये, असं भारत सरकारची बाजू मांडणाऱ्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसनं स्पष्ट केलंय.

मुंबईत मोदीच्या 'स्वागता'ची तयारी

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील सर्वात सुरक्षित असलेल्या बराक क्रमांक १२ मधली एक खोली सज्ज ठेवण्यात आलीय. नीरव मोदीचं प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याच्या कोठडीबाबत काय तयारी आहे? अशी विचारणा केंद्र सरकारनं राज्याच्या गृहखात्याला केली होती. त्यानुसार बराक क्रमांक १२ मधल्या दोन खोल्यांपैकी एक सध्या रिकामी असून तिथंच नीरवला ठेवण्यात येईल, असं केंद्राला कळवण्यात आलंय. दुसऱ्या खोलीत सध्या तीन कैदी आहेत. नीरव मोदीसोबत विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा खटलाही सुरू असून त्यालाही याच खोलीत ठेवण्यात येणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x