नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं राजकीय पाठिंबा देण्याची विनंती झेलेंन्स्की यांनी मोदींना केलीय. तर युक्रेनियन अधिकाऱ्यांना भारतीयांना सुरक्षित देशाबाहेर काढण्यासाठी मदत करावी, असं मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितलं आहे.
सध्या रशियाच्या फौजा युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसल्या असून, शहरात मोठी आणीबाणीची स्थिती आहे. कीव्हमध्ये प्रचंड गोळीबार सुरू आहे. युक्रेन आणि रशियन फौजा अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
युद्धाच्या तिस-या दिवशी रशियन फौजांनी तब्बल 600 किलोमीटरची मुसंडी मारत युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरकाव केलाय. किव्हमध्ये दोन्ही देशांच्या फौजांमध्ये तुफान फायरिंग सुरू आहे.
बंकरमध्ये लपून युक्रेनच्या फौजा रशियाचा हल्ला परतवून लावत आहेत. विशेष म्हणजे कीव्हच्या जनतेकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे. कीव्हमधील जनतेच्या हाती शस्त्र देण्यात आली असून तब्बल 17 हजार रायफली वाटण्यात आल्या आहेत.
या सगळ्या धामधुमीत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की राजधानी कीव्हमध्येच ठाण मांडून आहेत. कोणत्याही स्थितीत देश सोडणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.