रवी पुजारी म्हणतो, माय नेम इज 'अँथनी फर्नांडिस'

रवी पुजारी याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Updated: Feb 11, 2019, 02:49 PM IST
रवी पुजारी म्हणतो, माय नेम इज 'अँथनी फर्नांडिस'  title=

मुंबई : अंडर्वल्ड गँगस्टर रवी पुजारीच्या प्रत्यार्पणास आणखी दिरंगाई होऊ शकते असं सध्या उदभवलेली परिस्थिती पाहून स्पष्ट होत आहे. सेनेगल सरकारच्या ताब्यात असणाऱ्या रवी पुजारी याने त्याची ओळख स्वीकारण्यास नकार दिला असून, त्यासंबंधी त्याने सेनेगल सरकारकडे आपला  पासपोर्ट सुपूर्द करत याविषयीचा अर्ज दाखल केला आहे. वकिलांच्या मदतीने त्याने आपली ओळख रवी पुजारी अशी नसून, बुर्किना फासोचा अँथनी फर्नांडिस नामक रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. 

सेनेगलमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावास अधिकाऱ्यांशी संपर्कात असणाऱ्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पुजारीच्या प्रत्यार्पणासाठीचे कागदपत्र पुरवण्यात आले आहेत. ज्यामध्ये १३ रेड- कॉर्नर नोटीस असून, मुंबई आणि कर्नाटक येथील गुप्तचर यंत्रणा, पोलिसांकडून देण्यात आलेली नोटीस आणि खोट्या पासपोर्टसंबंधी सेनेगल सरकारला दिलेला अहवाल सोपवण्यात आला आहे. सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारतीय दूतावासाला पुजारीची ओळख पटवून देणारे प्रत्यार्पणासाठीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. 

पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेमध्ये मुंबई आणि कर्नाटक पोलिसांकडून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या डीएनएचे पुरावे मागवण्यात आले असून, अटक करण्यात आलेला इसम हाच पुजारी असल्याचं सिद्ध करण्यात या पुराव्यांची मदत होणार आहे. त्याच्या बहिणींकडूनही डीएनएच्या नमुन्यांची मागणी करण्यात येणार असल्याचं कळत आहे. पुजारीच्या बहिणी जयलक्ष्मी सालियान आणि नैना पुजारी या दिल्लीमध्ये राहतात. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारीच्या पत्नीकडे आणि त्याच्या तीन मुलांकडे बुर्किना फासोचे पासपोर्ट आहेत. पुराव्यांची होणारी ही जमवाजमव पाहता पुजारीच्या प्रत्यार्पणास आणखी वेळ दवडला जाऊ शकतो हे आता स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला पुजारी ज्या देशाच्या ताब्यात आहे त्यांच्याकडून दोन्ही देशांतर्फे मांडण्यात येणारी बाजू ऐकून त्यानुसार पुढील निर्णय देणं अपेक्षित आहे. मुख्य म्हणजे अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या रवी पुजारी याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्यामुळे व्यापारी, हॉटेल मालक, सोन्याच्या दागिन्यांचे दुकान मालक आणि चित्रपट व्यवसायातील पुजारीशी जोडल्या गेलेल्या काही मंडळींमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेव्हा येत्या काळात प्रत्यार्पणाच्या या प्रक्रियेला पुढे कोणतं वळण मिळणार हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.