Nitin Gadkari On Petrol Price: आपली कामं, वक्तव्यांबरोबरच मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींनी इंधन दरांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार घडलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर गडगडतील अशी शक्यता आहे. यासंदर्भातील भाकित त्यांनीच व्यक्त केलं आहे.
नितीन गडकरींनी 4 जुलै रोजी (मंगळवारी) राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या योजनांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले असून त्यापैकी 60 वर्ष काँग्रेस सत्तेत होती. त्यांना देशातील गरीबी दूर करता आली नाही, असा टोला गडकरींनी लगावला.
आपल्या भाषणादरम्यान गडकरींनी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासंदर्भातही भाष्य केलं. शेतकरी आता केवळ अन्नदाता राहणार नसून ऊर्जादाताही होणार असल्याचं गडकरी म्हणाले. ऑगस्टमध्ये आपण टोयोटा कंपनीच्या काही कार्स लॉन्च करणार आहोत. या सर्व नव्या गाड्या शेतकऱ्यांच्या मदतीने तयार होणाऱ्या इथेनॉलवर धावतील, असं गडकरींनी जाहीर केलं. 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचं इंधन वापरलं गेलं तर पेट्रोलचे दर 15 रुपये प्रती लिटरपर्यंत घसरतील, असंही गडकरी म्हणाले. देशात सध्या 16 लाख कोटी रुपयांचं कच्च तेल आयात केलं जात असल्याची माहितीही गडकरींनी दिली.
#WATCH अब सारी गाड़ियां इथेनॉल पर चलेंगी। 60% इथेनॉल और 40% बिजली, इसका आंकलन करें तो पेट्रोल की कीमत 15 रुपए प्रति होगी। जनता का भला होगा, किसान उर्जा दाता बनेगा: प्रतापगढ़ में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राजस्थान (04.07)
(सोर्स: नितिन गडकरी सोशल मीडिया) pic.twitter.com/JquMd0ZsGN
— ANI_HindiNews (@AHindinews) July 5, 2023
इथेनॉलच्या उत्पादनामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. वाचलेला हा पैसा शेतकऱ्यांसाठी खर्च केला जाईल असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. वाहन उद्योगातील उलाढाल ही 7.5 लाख कोटींची आहे. यामध्ये साडेचार कोटी तरुणांना रोजगार मिळाला आहे. तो दिवस फार दूर नाही जेव्हा हे क्षेत्र 10 कोटी लोकांना रोजगार देईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. वेगाने विकास होत असल्याने भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत लवकरच जागतिक महाशक्ती बनेल, असंही गडकरी म्हणाले.