नवी दिल्ली : भारतात लवकरच गरिबांसाठी 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' योजना लागू होऊ शकते. केंद्र सरकार या योजनेवर विचार करत आहे.
'सीएनबीसी आवाज'नं दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या योजनेला प्रारंभ होऊ शकतो. याची सुरुवात बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यापासून होऊ शकते.
या योजनेनुसार, गरीब कुटुंबांना सबसिडी देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा होणार आहे. गरीब कुटुंबांना रेशनऐवजी पैसे हातात मिळाल्यामुळे रेशनचा काळाबाजारही रोखला जाऊ शकतो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल.
उल्लेखनीय म्हणजे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) च्या म्हणण्यानुसार, भारतात खाण्यात आणि इंधनावर दिली जाणारी सबसिडी संपवण्यात आली तर देशातील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी वार्षिक २६०० रुपये उत्पन्न सरकारकडून दिलं जाऊ शकतं. आर्थिक सर्वेमध्ये या योजनेचा विचार प्रामुख्यानं केला गेला होता.
खाद्य मंत्रालयानं या योजनेसाठी प्रस्ताव तयार केलाय. अर्थ मंत्रालयानंही या प्रस्तावाला सहमती दर्शवलीय.