ईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट

अर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच खर्च परवडत नाही. अशा स्थितीत  आयुष्मान भारत योजनेमुळे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. 

Updated: Jun 29, 2023, 06:08 PM IST
ईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट title=

UP News: किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया या अत्यंत महागड्या असतात. सर्वसामान्य लोकांना याचा खर्च परवडत नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेमुळे (Ayushman Bharat Yojana) एका तरुणीला जीवदान मिळाले आहे. मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले आहे. उत्तर प्रदेशातील नाझीश (वय वर्षे 28) या तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांन ईद सणाची अनोखी भेट मिळाली आहे. केंद्र  सरकारच्या आयुष्मान भारत योजनेमुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील पहिले किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले आहे.  28 वर्षीय नाझीशला यामुळे जीवदान मिळाले आहे. कारण, मोल मजुरी करणाऱ्या नाझीशच्या कुटुंबियांना किडनी ट्रान्सप्लांट उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. मात्र, सरकारच्या योजनेमुळे नाझीशचे  किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन करणे तिच्या कुटुंबियांना शक्य झाले आहे. 

नाझीश ही मेरठ जिल्ह्यातील सरधना तहसीलच्या दौराला ब्लॉकमधील वलीदपूर गावात राहणारी आहे. नाझीशचे वडिला सलीम अहमद आणि आई सबीला दोघेगी मोल मजुरीचे काम करतात. नाजीश हिची किडनी निकामी झाली होती. यामुळे किडनी प्रत्यारोपणशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांना सांगितले. मात्र, उपचाराचा खर्च ऐकून नाझिशच्या कुटुंबियांचे डोकं चक्रावले.  सलीम आणि त्यांचा मुलगा आझम हे कसेतरी काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नाझीशच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने तिच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्याचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता. 

आयुष्मान भारत योजनेमुळे नाझिशवर उपचार झाले

पण, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे एकही पैसा खर्च न करता  नाझिशवर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. किडनी प्रत्यारोपणानंतर नाझीश आपल्या कुटुंबासह ईदच्या दिवशी घरी पोहोचली. 20 जून रोजी यशोदा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नाझीशवर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ

झारखंडमधील रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत देशभरातल्या 40 कोटींहून अधिक गरीबांना लाभ मिळू शकणार आहे. या योजनेतंर्गत एका कुटुंबाला वर्षाला 5 लाखांपर्यंतची वैद्यकीय मदत मिळत आहे.