UPSCचा टॉपर प्रेयसीचे आभार मानतो तेव्हा....

माध्यमांसमोरच त्याने तिचे आभार मानले 

Updated: Apr 11, 2019, 04:33 PM IST
UPSCचा टॉपर प्रेयसीचे आभार मानतो तेव्हा....  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षांचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. या परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थींचं अभिनंदन केलं. या साऱ्यामध्ये जयपूरच्या कनिष्क कटारियाचं नाव विशेष चर्चेत राहिलं. देशातून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या कनिष्कने त्याच्या वाट्याला आलेल्या या अद्वितीय यशाचं श्रेय़ देताना चक्क प्रेयसीनेही जाहीरपणे आभार मानले. 

'माझ्यासाठी हा एक अनपेक्षित आणि तितकाच आनंददायी क्षण आहे. पहिला क्रमांक पटकावणाऱ्याचा मी विचारही केला नव्हता. या यशासाठी मला मदत केल्याबद्दल आणि मानसिक आधार दिल्याबद्दल मी आई- बाबा, बहीण आणि माझ्या प्रेयसीचे आभार मानतो', असं तो माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला. 

आपल्याकडून चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल अशीच अनेकांची अपेक्षा असेल आणि हाच माझा हेतू होता, असं म्हणत कनिष्कने आगामी कारकिर्दीत प्रशंसनीय काम करण्याच्या आशा व्यक्त केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेयसीचे आभार मानणाऱ्या कनिष्कचा हा अंदाज अनेकांनाच भावला. ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी त्याच्या प्रेयसीचंही कौतुक केलं. सहसा रिलेशनशिप आणि प्रेमसंबंधांविषयी खुलेपणाने बोलण्याला काहीजण प्राधान्य देत नाहीत. पण, कनिष्कने मात्र या समजुती पूर्णपणे मोडीत काढल्या आहेत. 

काही गोष्टी किंवा लक्ष्य गाठायचं असेल तर, प्रेम, नाती, कित्येकदा तर मैत्रीपासूनही दूर राहा असे सल्ले देणारे काही कमी नाहीत. पण, याच जवच्या व्यक्तींकडून मिळणारा पाठिंबा आणि आधार यांच्या बळावर कनिष्कने ही मजल मारली आहेत. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने प्रेमाचाही विजय आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

यूपीएससीच्या यंदाच्या निकालाविषयी थोडक्यात

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार यंदाच्या वर्षी यूपीएससी २०१८ च्या परीक्षेत एकूण ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १८० विद्यार्थ्यांनी आयएएस, ३० विद्यार्थ्यांनी आयएसएस तसेच १५० विद्यार्थ्यांनी आयपीएस रँक मिळविला आहे. तर ग्रुप ए मधून ३८४, ग्रुप बी मधून ६८ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि ग्रुप ए, ग्रुप बी च्या केंद्रीय लोकसेवेसाठी निवड केली जाते.