अहमदाबाद : भारत दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे पंतप्रधान मोदी आणि साबरमती आश्रमातर्फे खादीचं उपरणं भेट देऊन ट्रम्प यांचं स्वागत केलं. आश्रमाबाहेर पंतप्रधान मोदी, स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी पायातले बूट काढून महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला खादीचा हार अर्पण करत वंदन केलं. बापूजींच्या कार्याविषयी आणि साबरमती आश्रमाविषयी नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर आश्रमातल्या कक्षाची ट्रम्प यांनी पाहणी केली.
साबरमती आश्रमात असलेल्या बापूजींच्या चरख्याची माहिती ट्रम्प यांना मोदींनी दिली. चरख्याचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं महत्त्व सांगितलं. त्यानंतर चरख्यावर सूतकताई कशी करतात याचं प्रात्यक्षिक स्वतः ट्रम्प आणि मेलानिया यांनी अनुभवलं. ट्रम्प यांनी स्वतःच्या हाताने चरखा चालवला. आश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सहाय्य केलं.
चरख्यावर सूतकताई केल्यावर आश्रमात ट्रम्प यांनी काही काळ व्यतीत केला. ट्रम्प, मेलानिया आणि मोदी यांनी आश्रमात काही काळ खाली बसून निवांत वेळ घालवला. यावेळी भारताची स्वातंत्र्य चळवळ, महात्माजींचे कार्यविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली.