नवी दिल्ली : अनेकांना सेलिब्रिटी, नेतेमंडळींसह फोटो काढणं, ते सोशल मीडियावर पोस्ट करणं आवडतं. अनेकांना ही गोष्ट अभिमानास्पद वाटते. पण काही जण अशाप्रकारे नेत्यांसोबत फोटो काढल्यानंतर त्याचा चुकीचा वापरही करत असल्याचं समोर आलं आहे. मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. या फोटोच्या आधारे इतरांची फसवणूक करुन स्वत:चा फायदाही अनेक जण करताना दिसतात. परंतु आता अशाप्रकारे फोटो पोस्ट करण्यावर आता कडक पावलं उचलली जाणार आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत. अशाप्रकारच्या व्यक्तींचा किंवा चिन्हाचा व्यावसायिक वापर केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते.
व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास १ ते ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.
आतापर्यंत, राष्ट्रीय ध्वजाचा किंवा अशोक चक्राच्या चुकीच्या वापरावर केवळ ५०० रुपयांचा दंड होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रच्या फोटोचा चुकीचा किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याची माहिती आहे. या तक्रारी लक्षात घेता, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चिन्ह आणि नाव (चुकीच्या वापरावर प्रतिबंध) कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
काही दिवसांपूर्वी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारा डिजिटल इंडिया अभियानला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. यापुढे अशाप्रकारच्या कोणत्याही घटना घडू नये, यासाठी सरकारकडून कडक नियम करण्यात येणार आहेत.