Man Stabbed Wife In Front of Kids: रागाच्या भरात घेतलेला एखादा निर्णय आयुष्य खराब करु शकतो, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरामध्ये असाच संतापातून घडलेला विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील अलाया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आदित्य कपूरने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. या हत्येमागील कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आदित्यचं कपड्याचं शोरुम आहे. मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये त्याचं व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. कोरोनामध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे केवळ व्यवसाय बंद करावा लागला असं नाही तर आदित्यवर दुसऱ्यांच्या दुकानात काम करण्याची वेळ आली. या सर्व घडामोडींमुळे तो फार तणावामध्ये होता. अनेकदा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो बचावला. त्याने याच तणावामधून मद्यपान करण्यास सुरुवात केली. अनेकदा तो दारुच्या नशेत पत्नीबरोबर वाद घालायचा.
शनिवारी रात्री असाच प्रकार आदित्य आणि त्याच्या पत्नीमध्ये घडला. आदित्य नेहमीप्रमाणे नशेत घरी पोहोचला. पती घरी उशीरा आल्याने पत्नी शिवानेने दरवाजा उघडला नाही. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर दरवाजा उघडला असता आदित्य त्याच्या पत्नीबरोबर वाद घालू लागला. दोघांमधील वाद विकोपाला गेला. आदित्यने किचनमधील चाकू आणून शिवानीवर वार करण्यास सुरुवात केली. शिवानीच्या पाठीवर आणि मानेवर वार केले. अचानक झालेल्या या हल्लामुळे शिवानी रक्तबंबाळ होऊन खाली पडली. हा सारा प्रकार आदित्य आणि शिवानीच्या दोन मुलांसमोरच घडला. सुरुवातीला या दोघांनी काहीही केलं नाही. मात्र आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून दोघांनी वडिलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
आदित्यला त्याच्या दोन्ही मुलांनी एका रुममध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांना धक्का देऊन आदित्यने तिथून पळ काढला. धावपळ सुरु असतानाच घाबरलेल्या आदित्यने स्वत:ला वाचवण्यासाठी भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मेडिकल कॉलेज ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. आदित्यच्या मुलानेच फोन करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शिवानीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. शिवानीचा मृत्यू झाला असून आदित्य मृत्यूशी झुंज देत आहे. मुलांना आता काय करावं कळत नसून काहीही दोष नसताना वडिलांच्या क्षणभराच्या संतापाचा मोबदला आता मुलांना मोजावा लागणार आहे. या दोघांच्या नातेवाईकांनाही घडलेल्या प्रकरणामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे.