नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

Trending News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नवरा मुलगा घोडी चढला, पण त्याचवेळी समोर आलेल्या मावशीच्या मुलाने त्याच्या गोळ्या झाडल्या. गोळीबारात नवरा मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

राजीव कासले | Updated: May 20, 2024, 12:07 PM IST
नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...' title=

Trending News : लहानपणी झालेल्या एका घटनेचा राग मनात धरुन ऐन लग्न सोहळ्यात नवरा मुलावर गोळ्या झाडण्याची (Firing) धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा मुलाच्या मावस भावानेच हा गोळीबार केला, यात नवरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गोळ्या झाडणाऱ्या तरुणाला लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधिन केलं. पोलिसांच्या जबाबात आरोपीने गोळीबार का केला हे सांगितलं. कारण ऐकून पोलिीसही हैराण झाले. 

काय आहे नेमकी घटना?
झाशीतल्या कुंडा क्षेत्रातील गढीनेगी गावात राहाणाऱ्या ओम प्रकाश यांचा मुलगा करन कुमार यांचं रामपूर (Rampur) इथं राहणाऱ्या हरदयाल यांच्या मुलीशी लग्न ठऱलं. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या मुहूर्तावर गढीनेगीहून रामपूरला वरात निघाली. नवरा मुलगा करन कुमार घोडीवर स्वार झाला. नवरा मुलाच्या नातेवाईकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. वरात पुढे सरकत असतानाच अचानक एक घटना घडील. करन कुमार याच्या मावशीचा मुलगा अजय कुमार अचानक वरातीत घुसला आणि त्याने समोरून करन कुमारवर दोन गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी करन कुमारच्या छातीत घुसली. यामुळे करन जागेवरच कोसळला. 

गोळ्या झाडण्याचं धक्कादायक कारण
अचानक घडलेल्या या घटनेने लग्न सोहळ्यात अफरातफर उडाली. गोळीच्या आवाजाने लोकं सैरावैरा पळू लागली. त्याचवेळी काही जणांनी करन कुमारला उचलून रुग्णालयात दाखल केलं. यादरम्यान गोळ्या झाडणाऱ्या अजय कुमारलाही लोकांनी पकडलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलं. करनवर गोळया का झाडल्या याचं अजयने दिलेलं कारण खूपच धक्कादायक होतं. लहानपणी कोणत्यातरी विषयावरुन झालेल्या भांडणात करन कुमारने अजय कुमारला कानाखाली मारलं होतं. याचा राग अजयने तरुणपणापर्यंत मनात कायम धरला होता.

करनचा मामा चंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजय कुमार लहानपणी करन कुमार याच्या घरीच राहायचा. त्यावेळी करनने अजयला कोणत्या तरी झालेल्या भांडणात कानाखाली मारली. याचा राग अजयच्या मनात होता. कधी तरी या अपमानाचा बदला घ्यायचा हे अजयने मनाशी निश्चित केलं होतं. यासाठी त्याने गावठी कट्टा मिळवला आणि ऐन लग्नाच्या दिवशी त्याने करनवर गोळ्या झाडल्या. 

अजयला लग्नाचं निमंत्रण
लहानपणी झालेलं भांडण करन कधीच विसरूनही गेला होता. करनने अजयला लग्नाचं निमंत्रणही पाठवलं होतं. हीच वेळ साधत आरोपी अजयने आपला हेतू साध्य केला. सुदैवाने या हल्ल्यातून करन बचावल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. रामपूरच्या सरकारी रुग्णालयात करनवर शस्त्रक्रिया करण्यात आली.