22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलं

Youth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 20, 2024, 11:37 AM IST
22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलं title=
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला (फोटोत मयत पुनित)

Youth Found Dead In Rented Room: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या रुममध्ये सापडला. भावरा कुँवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील शांती नगर परिसरात हा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने साडी नेसून आत्महत्या केल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

मृत्यूसंदर्भातील गूढ वाढलं

पोलिसांना या तरुणाचा मृतदेह साडी नेसलेल्या अवस्थेत सिलींग फॅनला लटकलेला सापडला. या तरुणाचे दोन्ही हात मागे बांधलेले होते आणि त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली. तरुणाचा मृतदेह ज्या खोलीत सापडला त्या रुमची कडी आतून लावलेली होती. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गूढ अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडला आहे ते पाहता या मृत्यूसंदर्भात उलट सुलट शंका उपस्थित केली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वीच आईशी बोलला होता

नववधूप्रमाणे नटलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडला. अंगावर साडी, ओढांवर लिपस्टीक, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर टीकली अशा अवस्थेत या तरुणाचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला पोलिसांना आढळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या तरुणाचं नाव पुनित दुबे असं आहे. तो रायसेन येथील रहिवाशी होता. तो मध्य प्रदेशमधील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यासाठी तो मागील 3 वर्षांपासून इंदूरमध्ये वास्तव्यास होता. पुनितबरोबर रुममध्ये राहणारे इतर मित्र बाहेर गेलेले असताना तो मागील आठवडाभर तो एकटाच राहत होता. पुनितचे वडील त्रिभुवन दुबे यांनी दोन दिवसांपूर्वीच तो त्याच्या आईशी बोलला होता अशी माहिती दिली. 

फोन स्वीच ऑफ झाल्यानंतर पालकांचा हॉस्टेलवर फोन

"दोन दिवसांपूर्व त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही त्याच्याशी नंतर समोरुन संपर्क केला नव्हता. तो क्लास आणि अभ्यासात व्यस्त असेल असं विचार करुन आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र त्यानंतर आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता आमचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्याला मोबाईल बंद पडला. त्यानंतर आम्ही हॉस्टेलमध्ये फोन केला. त्यांचा कर्मचारी पुतिनची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला मृतावस्थेत पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला," असं पुनितच्या वडिलांनी सांगितलं.

शवविच्छेदनासाठी पाठवला मृतदेह

पोलीस आणि पालकांना पुनितच्या मृत्यूसंदर्भात कळवण्यात आलं. पुनितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र पुनितच्या रुममध्ये आत्महत्येसंदर्भातील कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे.