ONGC गॅस प्रकल्पात भीषण आग

यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध

Updated: Sep 24, 2020, 07:48 AM IST
ONGC गॅस प्रकल्पात भीषण आग  title=
छाया सौजन्य- एएनआय

सूरत : गुजरात येथे असणाऱ्या ONGC प्रकल्पातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमरास सूरत येथे असणाऱ्या ओएऩजीसी गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागल्याचं वृत्त हाती आलं आहे. आगीचं स्वरुप पाहता सध्याही त्या ठिकाणी स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुंळं नजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. 

गॅस पाईपलाईनच्या स्फोटामुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून, एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. जो पाहता आगीचं मूळ स्वरुप लक्षात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु असून यात बऱ्याच अंशी यश मिळाल्याचं कळत आहे.

कोणतीही जिवीत हानी नाही

ओएनजीसी गॅस प्रकल्पात झालेल्या स्फोटाचं स्वरुप अतिशय भीषण होतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळानजीक असणाऱ्या गावांमधील घरांच्या खिडक्यांनाही यामुळं हादरा बसल्याचं जाणवलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अद्याप कोणहीतीही जिवीत हानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. 

 

सूरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस प्रकल्पामध्ये लागलेली आग ही 'ऑन साईट एमरजन्सी' या स्वरुपातील आहे. परिणामी 'ऑफ साईट एमरसन्सी' नसल्यामुळं नजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एखाद्या प्रकल्पापुरताच जेव्हा समस्या सीमीत असते तेव्हा ती  'ऑन साईट एमरजन्सी' म्हणून संबोधली जाते. तर, हीच स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन समस्या निर्माण करते तेव्हा या परिस्थितीकडे  'ऑफ साईट एमरजन्सी' म्हणून पाहिलं जातं.