मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील

Latest New : जंगलात गेल्यानंतर तुमची ज्ञानेंद्रीय सतत सतर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, वेळप्रसंगी हीच सावधगिरी आणि सतर्कता तुमचा जीव वाचवू शकते. 

सायली पाटील | Updated: Dec 28, 2023, 12:43 PM IST
मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील title=
Viral news Two Brave Woman Faught With Tiger To Save Friends Life india news

Viral News : भारतातील अनेक राज्यांमध्ये विस्तीर्ण क्षेत्र घनदाट वनांनी (Forest) व्यापलं असून, या वनांमध्ये असंख्य प्रजातींच्या वन्य जीवांचा वावर पाहायला मिळतो. या प्राण्यांपैकी काही हिंस्र प्राणी कायमच काळजाचं पाणी करतात. हे प्राणी दुरून पाहणं जितक्या कौतुकाची बाब, तितकेच ते जवळ आले की मात्र थरकाप उडतो ही काळ्या दगडावरची रेघ. अशा या वन्य जीवांना अधिकाधिक वावर असणारं देशातील एक ठिकाण म्हणजे उत्तराखंड. 

मागच्या काही दिवसांपासून (Uttarakhand) उत्तराखंडमध्ये वन्य जीवांना मानवी अधिवासावर होणारा हल्ला पाहता प्रशासनानं आता याकडे गांभीर्यानं लक्ष देत नारिकांना काही दिवसांसाठी जंगलांमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नव्हे, तर वन विभागाकडून वनक्षेत्रामध्ये गस्तही घातली जात आहे. 

चंपावतमध्ये घडली काळजाचं पाणी करणारी घटना... 

उत्तराखंडच्या चंपावरत जिल्ह्यामध्ये दोन महिलांनी मोठ्या धाडसानं हल्लेखोर वाघाशी दोन हात करत त्यांच्या मैत्रिणीचा जीव वाचवला. 26 डिसेंबर रोजी ही घटना बून वनक्षेत्रामध्ये घडल्याची माहिती वनविभागानं दिली. त्या दिवळी गीता देवी, जानकी देवी आणि पार्वती देवी नावाच्या तीन महिला गुरांना चरण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी वाटेत सुगावाही लागणार नाही अशा पद्धतीनं दडून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. गीता देवीवर वाघ धावून गेला आणि त्यानं तिला जंगलाच्या दिशेनं फरफटत नेण्यास सुरुवात केली. 

गीता देवीची वाघाशी झुंज सुरु असल्याचं पाहून तिच्या दोन्ही मैत्रिणींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी मोठ्आ धाडसानं आजुबाजूला असणारे दगड उचलून ते वाघाच्या दिशेनं ताकदीनं भिरकावले, हातातल्या काठ्यांनी त्याच्यावर आघात केले. या दोघींच्या प्रतिहल्ल्यानं वाघ नमला आणि एका क्षणात त्यानं जंगलाच्या दिशेनं पळ काढला. 

हेसुद्धा वाचा : ...अन् धीरुभाई अंबानी यांनी 3 दिवस शेअर बाजार बंद पाडला, नेमकं असं काय झालं होतं?

अतिशय गंभीर अशा हल्ल्यामध्ये गीता देवीला जबर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेतच तिला टनकपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथं तातड़ीनं तिच्यावरील उपचार सुरु झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वाघाच्या हल्ल्यामुळं गीतादेवीच्या जखमेवर 24 टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरीही आता ती धोक्यात नाही. 

दरम्यान, सध्या परिस्थिती गांभीर्य पाहता बून वनक्षेत्राच्या आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क केलं आहे. इतकंच नव्हे, तर त्यांना तूर्तास कोणत्याही कारणानं जंगलात न जाण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.