सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल...

Updated: Sep 24, 2020, 11:40 AM IST
सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल
फोटो सौजन्य : ट्विटर/सुशांत नंदा

नवी दिल्ली : धुम्रपान (Smoking) करणं आरोग्यास हानीकारक आहे. असं असूनही अनेकांना स्मोकिंग, धुम्रपानाची सवय सोडता येत नाही. अनेक जण धुम्रपानानंतर सिगारेटचे (Cigarette) तुकडे इतरत्र फेकून देत असल्याचंही चित्र पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर एका खेकड्याचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय वन सेवेत अधिकारी असलेले सुशांत नंदा यांना पशु-पक्षी, जनावरांचे फोटो-व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याची आवड आहे. कॅमेरामध्ये काढलेले फोटो, व्हिडिओ अनेकदा ते सोशल मीडियावर अपलोड करत असतात. नुकताच त्यांनी एका खेकड्याचा  (Crab) सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि बघता बघता तो प्रचंड व्हायरल झाला. सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खेकडा अगदी माणसाप्रमाणेच स्मोकिंग करताना दिसतोय. 

दरम्यान, काही मुलांनी स्मोकिंग केल्यानंतर सिगरेटचे तुकडे तिथेच टाकले होते. या खेकड्याने खाण्याची गोष्ट समजून सिगरेट तोंडात टाकली. त्यातून धूर येऊ लागला. तेवढ्यावरच न थांबता पंजाच्या साहाय्याने तो खेकडा सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. खेकड्याच्या कृतीनंतर, तेथे हजर असणारी काही मुलं हसत असल्याचा आवाजही व्हिडिओतून येत आहे.

एकीकडे पर्यावरण आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी जनजागृती करण्यात येत असताना दुसरीकडे अशाप्रकारच्या कृत्यांमुळे पर्यावरण, पशु-पक्षी, प्राण्यांना हानीदेखील होत आहे. सिगरेटचे जळते तुकडे इतरत्र फेकणं पर्यावरणासाठी तसंच आस-पासच्या पशु-पक्षांसाठीही अतिशय असुरक्षित ठरते आहे.