All India Weather Forecast: (North India) भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली, राजस्थान इथपासून ते अगदी काश्मीर (Kashmir) आणि स्पितीच्या खोऱ्यापर्यंत (Spiti valley) हिवाळ्यानं चांगलाच जोर धरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अतीथंडी आणि हिमवृष्टीमुळं (Snowfall) पर्वतीय भागांमधील वाहतुकीवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. यातच आता हवामान खात्यानं पुढील 5 दिवसांमधील परिस्थिती नेमकी कशी असेल यासंदर्भातील इशारा दिला आहे. आजपासून पुढचे 5 दिवस देशाच्या संपूर्ण उत्तर दिशेपासून पश्चिमेपर्यंत दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी तापमान 7 अंशांवरून थेट 3 अंशावर येईल. ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये पाण्याचे प्रवाह प्रभावित होतील असंही सांगण्यात आलं आहे.
किमान येत्या 10 दिवसांमध्ये तरी थंडीचा कहर कमी होणार नाही, ही बाब हवामान खात्यानं स्पष्ट केली आहे. त्यामुळं धुकं आणि थंडीच्या या दुहेरी माऱ्यासाठी आता सज्ज झालेलं उत्तम. आयएमडीच्या वृत्तानुसार पुढचे 5 दिवस दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये (Rajathan, Punjab, hariyana, chandigarh) सर्वत्र धुकं असेल. यामुळं दृश्यमानताही कमी असेल. राज्यांतील वाहतुकीवर याचे थेट परिणाम होणार आहेत.
उत्तर भारतात असणाऱ्या या परिस्थितीचे पडसाद महाराष्ट्र आणि उर्वरित भारतामध्ये पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील निफाड, सातारा, नागपूरमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला आहे. तर, मुंबईसह उपनगरीय भागांमध्ये तापमान 20 अंशाहूनही खाली उतरलं आहे. पुढील काही दिवस देशाच्या उत्तरेकडून अशाच शीतलहरी येत राहिल्यास वर्षाचा शेवट हा हुडहुडीनं होणार असंच चित्र पाहायला मिळू शकतं.
नव्या वर्षाची सुरुवातच थंडीनं....
हवामान खात्यानं निरीक्षणातून नोंदवलेल्या अंदाजानुसार नव्या वर्षाची सुरुवात आणि येणाऱ्या वर्षातील काही काळहा कडाक्याच्या थंडीतच जाऊ शकतो. त्यामुळं तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे जाण्याचे बेत आखत असाल किंवा बेत आखले असतील तर, त्या ठिकाणी असणाऱ्या तापमानाची माहिती एकदा नक्की घ्या. (Winter trips)
गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी देशाच्या उत्तरेकडे जाणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागली आहे. नागरिकांनी काश्मीर, स्पितीचं खोरं, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), राजस्थान, अरुणाचल प्रदेश या भागांना भेट देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. इथे महाराष्ट्रातही गिरीस्थानं म्हणू नका किंवा मग कोकण किनारपट्टी. सर्वत परिसर पर्यटकांनी फुलले आहेत. राज्यात महाबळेश्वर (Mahabaleshwar), पाचगणी (Panchgani), गुहागर (Guhagar), वेंगुर्ला (Vengurla) परिसर पर्टकांनी बहरले आहेत. तर, तिथे पार्टी आणि कल्ला या गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यामध्येही दर दिवसागणिक येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. गुलाबी थंडी आणि आनंदाचा हा माहोल कितीही हवाहवासा वाटत असला तरीही यामध्ये सर्वांनाच आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.