काँग्रेसच्या विजयाने २०१९ लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार?

५६ इंची छातीचा मुकाबला करण्यासाठी तुल्यबळ प्रतिस्पर्धी रणांगणात

Updated: Dec 11, 2018, 08:07 PM IST
काँग्रेसच्या विजयाने २०१९ लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? title=

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थात याचं श्रेय जातं हे राहुल गांधी यांनाच. या निकालांनी राहुल गांधींची प्रतिमा कशी तयार होईल, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर याचे काय परिणाम होतील. याचं विश्लेषण देखील आता सुरु झालं आहे. विरोधकांनी ज्यांना पप्पू असंही हिणावलं. तोच पप्पू लोकसभेची सेमीफायनल विशेष प्रावीण्यासह पास झालाय, असंही ते कदाचित हिणवू शकतील. पण विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी भविष्यातलं सक्षम नेतृत्व म्हणून राहुल गांधींची प्रतिमा आणखी बळकट केली आहे. गेल्या वर्षी याच डिसेंबर महिन्यात राहुल गांधींचा पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक झाला होता. आणि आता वर्षभरात त्यांच्या कर्तृत्वाचं प्रगतीपुस्तक समोर आहे.

गेल्या पाच वर्षांत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पंजाबचा अपवाद वगळता पक्षानं स्वबळावर एकाही राज्यात सत्ता मिळवली नव्हती. पण आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली तर राजस्थानात तब्बल चौपट जागा पटकावल्या.  

राहुल गांधींनी काय केलं?

1. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींनी राज्यांतल्या नेतृत्वांमध्ये बदल केले
2. राफेल आणि इतर मुद्द्यांवर मोदींना थेट आव्हान दिलं. 
3. मोदी आणि भाजपच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला.
4. ठिकठिकाणी देवदर्शन करुन मवाळ हिंदुत्वाचं धोरण अवलंबलं,
5. त्यामुळे काँग्रेसवरचा अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा डाग पुसला गेला... 
6. राज्य पातळीवर नेत्यांमधले मतभेद मिटवून दुरावा कमी करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले. 
7. तरुण नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या राहुल गांधींनी इतर पक्षांच्या चंद्राबाबू आणि देवेगौडांसारख्या जुन्या जाणत्या नेत्यांबरोबर जुळवूनही घेतलं.

याच वर्षी राहुल गांधींनी संसदेत पंतप्रधानांना मारलेल्या मिठीवरुन त्यांच्यावर अपरिपक्वपणाची टीकाही झाली. पण प्यार से जितेंगेवर राहुल गांधींचा विश्वास होता.

राजस्थानमधली सत्ताबदलाची परंपरा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधली प्रस्थापितविरोधी लाट याचा वाटा काँग्रेसच्या यशामध्ये असला तरी राहुल गांधींची संघटनाबांधणी आणि सर्वसमावेशकतेचं राजकारणही यानिमित्तानं अधोरेखित झालं. तेलंगणामध्ये तेलुगू देसम पक्षाबरोबच्या युतीचा काँग्रेसचा अंदाज चुकला आणि ईशान्येकडचं शेवटचं राज्य मिझोराम काँग्रेसनं गमावलं. पण तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.

स्लो आणि स्टेडी असं राहुल गांधींचं नेतृत्व आहे... गुजरातमध्ये हरुनही जिंकलेली बाजीगर काँग्रेस, कर्नाटकात जेडीएसबरोबरची सत्ता आणि आता तीन राज्यांमधलं काँग्रेसचं यश राहुल गांधींचं नेतृत्व अधोरेखित करणारं ठरलंय...

राहुल गांधींच्या या यशानं काय साधलं ?

या निकालांनी राहुल गांधींचं काँग्रेस पक्षातलं स्थान तर मजबूत केलंच. पण २०१९ मध्ये महाआघाडी झालीच तर राहुल गांधींच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला. राहुल गांधींच्या टीकाकारांची तोंडंही काही प्रमाणात बंद होतील. आगामी लोकसभा निवडणुकीत ५६ इंची छातीचा मुकाबला करण्यासाठी तुल्यबळ प्रतिस्पर्धी रणांगणात आहे. याची दखल सगळ्यांना घ्यावीच लागणार आहे.