मुंबई: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं काय? सर्जिकल स्ट्राईकची कारवाई कशा प्रकारे पार पाडली जाते? असे प्रश्न अनेकांना पडत असतील. भारताने सर्जिकल स्ट्राईक केले म्हणजे शत्रूंवर मात केली. एवढीच माहिती अनेकांजवळ असते. कित्येकांना माहिती नसते की, सर्जिकल स्ट्राईकची कारवाई कशाप्रकारे पार पाडली जाते. १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद संघटनेने भारतावर भ्याड हल्ला केला होता. त्यामुळे ४० भारतीय सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. याची माहिती मिळताच संपूर्ण भारतात संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. शहिद झालेल्या सैनिकांना योग्य न्याय मिळावा, असे भारतातील प्रत्येक नागरिकाला वाटत होते. भारतीय वायुदलाने सर्जिकल स्ट्राईक करून दहशदवाद्यांचे तळे उदध्वस्त करुन भारतीयांची मनं जिंकली. भारताने याआधी २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सविस्तर चर्चा आणि नियोजन करुन नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाते. आंतरराष्ट्रीय कायद्यात समाविष्ट असलेल्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे असते. त्यानंतरच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती किंवा सार्वजनिक पायाभूत सुविधांना हानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन भूदलाच्या साह्याने किंवा विमानातून शत्रूचा नायनाट करणे याला 'सर्जिकल स्ट्राईक' असे म्हटले जाते.