हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Hindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.

वनिता कांबळे | Updated: Aug 11, 2024, 11:10 PM IST
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला title=

Hindenburg Research :  अदानींच्या साम्राज्याला हादरवून टाकणाऱ्या हिंडेनबर्गने आता नव्या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.  हिंडेनबर्गने थेट सेबीवरच बॉम्ब टाकला आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचं अदानी ग्रुपसोबत कनेक्शन आहे. अदानींच्या मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर फंडामध्ये माधबी पुरी बुच यांचा हिस्सा आहे. ज्या देशात कमी कर लागतो अशा देशातल्या कंपनीतून सेबीच्या प्रमुखांची कंपनी अदानी ग्रुपचे शेअर विकत घेत होती. सेबीच्या प्रमुखांची कंपनी या माध्यमातून लाखो करोडो रुपयांचा फायदा वसूल करत होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होमार जाणून घेऊया. 

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या नेमके काय आरोप आहेत?

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी अदानी समुहाशी संबंध असलेल्या ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळेच 2023 मध्ये हिंडेनबर्गने अदानी समुहावर प्रकाशीत केलेल्या अहवालावर त्यामुळेच सेबीने कारवाई केली नाही आणि अदानींना निर्दोष ठरवल्याचा आरोप हिंडेनबर्गने केलाय. सेबीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप निराधार आणि तथ्यहिन आहेत. आर्थिक कागदपत्रांचा खुलासा करण्यास आम्हाला कोणताही संकोच नाही.  हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात सेबीने कारवाई केलेली आहे. त्यामुळे आमचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हंटल आहे. 

अदानी ग्रुपचा खुलासा

हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे अफवा आहे. हा अहवाल म्हणजे तथ्य आणि कायद्याचं पूर्णपणे केलेलं उल्लंघन आहे. हे आरोप म्हणजे बिनबुडाच्या दाव्यांचा पुनर्वापर आहे. सुप्रीम कोर्टाने जानेवारी 2024 मध्येच हे आरोप फेटाळले आहेत. अहवालात ज्यांचं नाव घेण्यात आलंय त्यांच्याशी अदानी ग्रुपचा कोणताही संबंध नाही. 

भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढतेय ते पाहून इतर देश चिंतेत आहेत.. त्यामुळे असे अहवाल आणून भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोपही करण्यात येतोय. कारण अशा अहवालानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य लोक घाबरतात.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिंडेनबर्ग अहवालातल्या आरोपांची चौकशी करणार? पंतप्रधान कार्यालय हिंडेनबर्गच्या अहवालावर कारवाई करणार का? प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.  हिंडेनबर्गच्या अहवालानंतर सेबीच्या प्रमुखांना हटवलं जाणार का? असे प्रश्न आता गुंतवणूकदार विचारतायत. 

शेअर बाजारातल्या व्यवहारांवर काय परिणाम होणार? 

शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते गेल्या वेळी जसा शेअर बाजार पडला तसा परिणाम होणार नाही. हिंडेनबर्गच्या अहवालाचा थोडाफार परिणाम दिसेल, मात्र मोठा फरक पडणार नाही.  अल्पावधीसाठी शेअर बाजारावर परिणाम दिसेल. मात्र मोठी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे. हिंडेनबर्गने फक्त आरोप केले आहेत, ते अजून सिद्ध झालेले नाहीत.. त्यामुळे बाजारात शेअर विक्रीची शक्यता कमी आहे. मात्र, बाजाराचा मूड पाहूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली तर गुंतवणूकदारांना चांगली संधी मिळेल आणि त्यांना चांगला नफा मिळू शकेल असाही काही विश्लेषकांचा अंदाज आहे.