मुंबई : चांदीचे पैंजण हे भारतीय महिलांच्या पेहरावात हमखास वापरले जाते. त्यामुळे पायांचे सौंदर्य तर वाढतेच पण त्याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्राशी आहे. असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली होती. त्यामुळे चांदीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत चांदीच्या पैंजणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
परंतु इजिप्त आणि मध्य पूर्व आशियातील देशांमध्ये हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. या देशांमध्येही पैंजण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणामासाठी घातले जातात.
चांदी ही एक प्रतिक्रियाशील धातू आहे आणि तो एखाद्याच्या शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करतो. आपली बरीचशी उर्जा आपल्या शरीरातून हात-पायातून बाहेर पडते आणि चांदी, कांस्य यांसारखे धातू अडथळा म्हणून काम करतात, जे आपल्या शरीरातून उत्सर्जित होणारी ऊर्जा परत करण्यास मदत करतात. चांदीची अंगठी किंवा पैंजण ही ऊर्जा बाहेर पडू देत नाहीत.पैंजण घातल्याने व्यक्तीला अधिक उत्साही आणि अधिक सकारात्मक असल्याचे जाणवते.
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा धातू म्हणून चांदीकडे पाहिले जाते. हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा खलाशी लांबच्या प्रवासात जात असत. तेव्हा ते चांदीची नाणी सोबत घेऊन जात असत, ती नाणी पाण्याच्या बाटल्यांमध्ये ठेवत असत आणि त्या बाटल्यांमधलेच पाणी पित असत. चांदीचे आयन बॅक्टेरिया नष्ट करतात.
महिला स्वयंपाकघरात तासन्तास उभे राहून काम करतात. त्यांच्या पायात वेदना उद्भवत नाही. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. याव्यतिरिक्त, चांदीचे पैंजण आपली प्रतिकारशक्ती आणि हार्मोनल संतुलन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.
आपल्या देशातील विवाहित स्त्रिया चांदीच्या अंगठ्या घालतात. त्यामुळे गर्भाशयाला निरोगी राहण्यास मदत होते. मासिक पाळीच्या वेदना देखील कमी करते.
----
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. 'झी24तास' याची पुष्टी करत नाही.)