पंतप्रधान नरेंद्र मोदी राखणारा का भगवंताच्या या मागणीचा 'मान'?

आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

Updated: Mar 24, 2022, 08:48 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी राखणारा का भगवंताच्या या मागणीचा 'मान'? title=

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंजाबच्या प्रश्नांवर चर्चा केली. मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो मुख्यमंत्री मान यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपैकी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळविला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने 117 जागांवर निवडणूक लढविली. त्यापैकी 92 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता प्राप्त केली.

निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार पंजाबमध्ये बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी त्यांचे गाव खटकर कलान येथे १६ मार्च रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर आज प्रथमच मोदी आणि मान यांची भेट झाली. या भेटीनंतर भगवंत मान यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल माझे अभिनंदन केले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी मला मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधान यांच्याकडे मी दोन वर्षांसाठी दरवर्षी 50 हजार कोटींची आर्थिक मदत मागितली आहे. पंजाबला पुन्हा देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार आहे असे म्हटले आहे.