नवी दिल्ली : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रकरणाची दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग समोर आज सुनावणी झाली. यावेळी आयोगाने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत.
समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दाखल घेत दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते.
मात्र, त्यांच्यावतीने आज ॲडिशनल कमिशनर प्रवीण पडवळ यांनी आयोगासमोर उपस्थित राहून आयोगाला माहिती दिली. यावेळी आयोगाने मंत्री नवाब मलिक यांच्यावर 7 दिवसात गुन्हा दाखल करून केलेल्या कारवाईची माहिती राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला देण्यात यावी असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
त्याचबरोबर राज्य अनुसूचित जाती पडताळणी समितीकडून करण्यात येणाऱ्या तपासाचा रिपोर्ट एका महिन्यात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सोपवण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 7 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.