Woman Stabbed By Brother Girlfriend: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या बहिणीचा गळा चिरला आहे. प्रियकराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ही तरुणी घटनास्थळावरुन फरार झाली. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला एम्स रुग्णालयामध्ये हालवण्यात आलं. सध्या ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून हल्लेखोर तरुणीचा शोध घेतला जात आहे.
गाझियाबादमधील कवि नगर पोलिस स्टेशनच्या हद्देतील गोविंदपुरममध्ये ही घटना घडली. सविता सिंह नावाची 30 वर्षीय महिला येथील एका घरामध्ये आपला पती आणि 2 मुलांसहीत भाड्याने राहत होती. सवितावरच हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सविताचा भाऊ यश चौहानचे दिल्लीतील योगिता नावाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. यासंदर्भातील माहिती सविताला होती. योगिता अनेकदा यशबरोबर सविताच्या घरीही आली होती. मागील काही दिवसांपासून यश आणि योगितामधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. योगिता विवाहित असल्याने तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला यशला त्याच्या घरच्यांनी दिला होता. मात्र यश योगिताबरोबरचं नातं संपवण्यास तयार नव्हता. यावरुनच त्याचं घरच्यांशीही अनेकदा भांडण व्हायचं.
शुक्रवारी अचानक योगिता यशच्या बहिणीच्या घरी म्हणजेच सविताच्या घरी पोहोचली. मात्र सविताने तुला यशला भेटता येणार नाही योगिताला सांगितलं. यावरुन दोघींमध्ये बराच वाद झाला. त्यानंतर योगिताने घरातील सुरीने सवितावर हल्ला केला. सुरी सविताच्या गळ्यावरुन फिरवल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून योगिताने घटनास्थळावरुन पळ काढला.
आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून सविताच्या मुलांनी आराडओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. तातडीने सविताला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला एम्समध्ये दाखल करण्यात आलं. एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये सध्या सवितावर उपचार सुरु आहेत. सविताच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आदारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून योगिताचा शोध घेण्यासाठी एका टीमची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच आम्ही योगिताला अटक करुन असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. योगिता नेमकी कुठे गेली, तिला पळून जाण्यास कोणी मदत केली आहे का यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्यानंतर यशचाही पत्ता नसून त्याचाही शोध पोलिस घेत आहेत.