कोल्लम : केरळमधील कोल्लम (Kollam) जिल्ह्यातील सस्थामकोट्टा येथे 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या घरात मृत अवस्थेत सापडली. विवाहित महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, नवरा हुंड्यासाठी तिचा छळ करीत होता. कुटुंबीयांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (BAMS) असेलेल्या विस्मयाने किरणशी लग्न केले. जो मूळचा कोल्लम जिल्ह्यातील आहे आणि मोटार वाहन विभागात सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करतो. गेल्या वर्षी दोघांचे लग्न झाले. दोन दिवसांपूर्वी विस्मायाने तिच्या चुलतभावाला मेसेज केला होता की, तिच्यावर हुंड्यासाठी अत्याचार केला जात आहे. लग्नात दिलेल्या कारवरुन नवरा किरणने वाद घातला आणि त्यानंतर तिला मारहाण केली गेली.
मारहाण केल्यानंतर विस्मयाने तिच्या शरीरावर जखमांचे फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये हात, पाठ, चेहरा आणि खांद्यांवर बरेच डाग दिसतात. विश्मयाच्या कुटुंबियांनी तिच्या पतीविरूद्ध पोलिसात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर हुंडासाठी छळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. केरळच्या महिला आयोगाच्या विभागानेही या प्रकरणात सूमोटो घेतला आहे.
विस्मयाचा भाऊ विजीथ व्ही. नायर यांनी सांगितलं की, लग्नात त्यांनी 800 ग्रॅम सोनं, एक एकर जमीन, टोयोटा यारीस कार हुंडा म्हणून दिली होती. त्यानंतर किरणने कारच्या बदल्यात पैशाची मागणी केली. हुंड्याच्या मागणीसाठी तो दररोज विस्मयसोबत भांडत असे आणि मारहाण करीत असे. विस्मयाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. किरणच्या अटकेनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. किरणवर हत्येचा खटला चालवला जावा अशी कुटुंबाची मागणी आहे.