अर्जवापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे.

Updated: Oct 7, 2019, 12:53 PM IST
अर्जवापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  title=

रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज वापसीला सुरुवात झाली आहे. राजापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर संतोष गांगण यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सेनेच्या राजन साळवी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळे हा तिढा सुटल्याचे सांगितले जाते. थोड्यावेळात राजापूरात शिवसेना आणि भाजपकडून संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन याची घोषणा केली जाईल. 

तर नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून मामा ठाकरे यांची मनधरणी सुरु होती. अखेर या शिष्टाईला यश आले. तसेच नाशिकमधील शिवसेनेचे उर्वरित दोन बंडखोर तीन वाजेपर्यंत माघार घेतील, असा दावा भाऊसाहेब चौधरी यांनी केला.

मात्र, कणकवली मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपचा तिढा कायम राहण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले होते. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते आक्रमक झाले होते. परिणामी सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपची युती तुटण्याची शक्यता आहे. तरीही भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. 

राज्यातील २७ मतदारसंघांत भाजपच्या ११४ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वाधिक ९ बंडखोर कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड मतदारसंघात शिवसेना उमेदवाराविरोधात उभे आहेत. पक्षातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या मुंबईचे तळ ठोकून आहेत.