रत्नागिरीतील धरण-धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेशबंदी

राजापूर येथील सवतकडा धबधब्यावर पर्यटक अडकून पडण्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.

Updated: Jul 9, 2018, 09:03 PM IST
रत्नागिरीतील धरण-धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेशबंदी title=

रत्नागिरी: राजापूर येथील सवतकडा धबधब्यावर पर्यटक अडकून पडण्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. अतिवृष्टी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भविष्यात असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाकडून अतिवृष्टी होत असल्याचा अंदाज काही दिवस आधीच वर्तविला जातो. त्या काळात धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात येणार आहे. काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करु शकतील,  परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून धोक्याच्या ठिकाणी बॅरिगेटस आणि फलक लावण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातही धबधब्यांच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आलीये.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मोठ्याप्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे फक्त रत्नागिरी नव्हे तर इतर जिल्ह्यांतूनही पर्यटक येथील धबधब्यांवर येत असतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी पर्यटक बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आगामी अतिवृष्टीच्या काळात धरणे आणि धबधब्यांवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा आणि अन्य धबधब्यांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.